आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tanta Mukti Yojana Successful In 16 Thousand Villages In Marathwada

16 हजार तंटामुक्त गावांची ‘शांततेतून समृद्धीकडे’ वाटचाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यातील 35 जिल्ह्यांत ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम’ ही वर्ष 2007 पासून सुरू करण्यात आली आहे. मोहीम स्थानिक पोलिस ठाण्यांतर्गत गाव (ग्रामपंचायत) पातळीवर स्थापित तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवण्यात येते. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील 16 हजार गावांनी (ग्रामपंचायत) गावातील तंटे गावातच मिटवत ‘शांततेतून समृद्धीकडे’ वाटचाल केली आहे. उर्वरित 11 हजार 902 ग्रामपंचायतीही आजघडीला तंटामुक्तीच्या वाटेवर मार्गक्रमण करत आहेत. विशेष म्हणजे पाच वर्षांच्या कालावधीत राज्यातील केवळ दोनच जिल्हे शंभर टक्के तंटामुक्त होऊ शकले आहेत.

राज्यात 15 ऑगस्ट 2007 पासून सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला गावपातळीवर ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावस्तरावर दरवर्षी नव्याने स्थापन होणार्‍या तंटामुक्त गाव समित्याच्या माध्यमातून गावात निर्माण झालेले दिवाणी, महसुली, फौजदारी, इतर तंटे तसेच नव्याने निर्माण होणारे तंटे लोहसहभागातून तसेच सामंजस्यातून मिटवले जात आहेत. त्यामुळे ‘तंटामुक्त गाव मोहीम’ ही आता मोहीम न राहता लोकचळवळ बनली आहे. या मोहिमेत सहभागी झाल्यामुळे गावातील सर्व प्रकारचे तंटे, वादविवाद मिटवण्यात ग्रामस्थ व तंटामुक्त समितीच्या पदाधिकार्‍यांना यश येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून गावात चालत असलेले वादविवाद व भांडणतंटे सामंजस्याने मिटवत ग्रामस्थांत एकमेकांविषयी माणुसकीची भावना निर्माण करण्यात या समित्या यशस्वी ठरल्या आहेत. वर्ष 2007-2012 या पाच वर्षांच्या कालावधीत राज्यातील 27 हजार 906 गावे (ग्रामपंचायत) पैकी 16 हजार 04 गावांनी गावांतील तंटे गावातच मिटवत ‘शांततेतून समृद्धीकडे’ वाटचाल केली आहे. उर्वरित 11 हजार 902 गावेही तंटामुक्तीची कास धरून गाव शंभर टक्के तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

दोनच जिल्हे झाले शंभर टक्के तंटामुक्त : राज्यात राबवण्यात येणार्‍या तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत मागील पाच वर्षांच्या कालावधीत 35 जिल्ह्यांपैकी केवळ लातूर व गोंदिया हे दोनच जिल्हे शंभर टक्के तंटामुक्त झाले आहेत. लातूर 786, तर गोंदिया जिल्ह्यात 556 ग्रामपंचायती आहेत. या दोन्हीही जिल्ह्यांतील गावांनी मोहिमेत सुरुवातीपासूनच हिरीरीने सहभाग नोंदवला होता. लातूर जिल्ह्यातील 786 गावांनी पहिल्याच वर्षी मोहिमेत सहभाग नोंदवला होता. मात्र, त्या वेळी 300 गावे ‘तंटामुक्त गाव’ म्हणून घोषित झाली होती, तर त्यापुढील वर्षी 371 गावे तसेच उर्वरित गावे ही तिसर्‍या वर्षीच तंटामुक्त म्हणून जाहीर झाली होती. त्यामुळे हा जिल्हा शंभर टक्के तंटामुक्त झाला.

शासनाने वाटप केले 382 कोटी
या मोहिमेअंतर्गत वर्ष 2007-2012 या पाच वर्षांच्या कालावधीत राज्यातील 16 हजार 4 गावे (ग्रामपंचायत)‘तंटामुक्त गावे’ म्हणून घोषित झाली आहेत. याच तंटामुक्त गावांपैकी 1 हजार 223 गावे ‘विशेष शांतता पुरस्कारा’साठी पात्र ठरली होती. यात वर्ष 2007-08 मध्ये 2 हजार 328 गावांसाठी 48 कोटी 90 लाख 50 हजार रुपये, 2008-09 मध्ये 2 हजार 891 गावांसाठी 68 कोटी 83 लाख 75 हजार रुपये, 2009-10 या वर्षातील 4 हजार 249 गावांसाठी 101 कोटी 55 लाख 25 हजार रुपये, 2010-11 मध्ये 3 हजार 824 गावांसाठी 93 कोटी 71 लाख रुपये आणि 2011-12 मध्ये 2 हजार 712 गावांसाठी 69 कोटी 59 लाख 25 हजार रुपये असे पाच वर्षांत राज्य शासनाने पुरस्काराच्या रकमेपोटी गावांच्या स्थायी विकासासाठी 289 कोटी 82 लाख 46 हजार रुपयांची रक्कम वाटप केली आहे.