आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जड वाहतुकीसाठी टापरगाव पूल बंद होणार, इतर पर्यायांचा विचार सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हतनूर - राष्ट्रीय महामार्ग क्र २११ शिवना नदीवरील टापरगावजवळील पूल पुन्हा बंद करण्यात आला असून, या अगोदर दि. २१ आॅक्टोबर रोजी दुपारी पुलाच्या दुतर्फा कमानी उभारून हा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. परंतु नियोजन शून्य करभारामुळे ही वाहतूक वळवण्याऐवजी बसवलेल्या कमान जड वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये अडकून तुटल्या होत्या. तुटल्याने वाहतूक पुन्हा सुरू झाली. या विषयी दैनिक दिव्य मराठी ने दि. २३ आॅक्टोबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून वाहतूक वळवण्यासाठी काही उपाय सुचवले होते ते आमलात आणत आता पुन्हा प्रशासनाने या टापरगाव येथील धोकादायक पुलावरील वाहतूक वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. कमानीचे खांब रोवले असून दोन दिवसांत कमान उभारणार आहेत.

जडवाहतुकीसह एसटीलाही औरंगाबाद - धुळेसाठी औरंगाबाद, कसाबखेडा, शिऊर बंगला, नांदगाव, मालेगावहून धुळ्याकडे, तसेच औरंगाबाद - चाळीसगावसाठी औरंगाबाद, कसाबखेडा मार्गे शिऊर बंगला, नांदगावहून चाळीसगाव व कन्नड - औरंगाबादसाठी पाणपोई, चापानेर, औराळा, शिऊर बंगला, औरंगाबाद, तर गल्लेबोरगाव ते कन्नडसाठी गल्लेबोरगाव, देवनाळा, देवगाव रंगारी, शिऊर बंगला, औराळा, चापानेर , पाणपोई, कन्नड हा मार्ग राहणार आहे.

यामधे जडवाहतुक करणाऱ्या वाहनांनाच वळण रस्ता असून छोटी वाहने या पुलावरून प्रवास करतील, जड वाहतूक वाहने वळवण्यासाठी पाणपोई तसेच गल्लेबोरगाव येथे चेक पोस्ट लावले जातील. या पुलावरून बसदेखील बंद होणार असून मिनी बसदेखील साडेआठ फूट उंचीची असल्याने व येथे नवीन बसवण्यात येत असलेली कमान ही आठ फूट उंचीची असल्याने ही छोटी बसदेखील बंद होणार आहे. दर दिवसाला या मार्गावर विविध आगाराच्या तीनशे ते चारशे बसेस धावतात. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.

त्यामुळे औरंगाबाद- कन्नड व कन्नड - औरंगाबाद या जवळच्या मार्गासाठी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एस टी प्रशासन सज्ज असून पुलाच्या दुतर्फा दर पंधरा मिनिटाला बस सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. पर्यायी रस्ते हे कमी रुंदीचे असल्याने या रस्त्याने जास्तीच्या बसेस पाठवणे धोकादायक होईल व या रस्त्याने वाढीव अंतर होत असल्याने कन्नड ते टापरगाव पूल व टापरगाव पूल ते औरंगाबाद असा पूल बंद झाल्यावर दर पंधरा मिनिटाला गाड्या सोडण्यात येईल, अशी माहिती कन्नड अागारप्रमुख प्रमोद देशमुख यांनी दिली.
२६ किमी वाढणार फेरा
बंद होत असलेल्या पुलामुळे हतनूर, टापरगाव, शिवराई व अलापूर या गावांना शेती माल दळवळणासाठी लांबून जावे लागेल. त्यामुळे वाहतूक खर्च व वेळ दोन्हीतही वाढ होईल, ऊस गाळप हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतुकीला ही अडथळा निर्माण होऊन दुरून वाहतूक झाल्याने शेतकरी तसेच कारखानदार यांचा वाहतूक खर्च वाढणार आहे.

नदीपात्रातून मार्गाचा पर्याय
या सर्वांवर पर्याय म्हणून एक महिन्यानंतर शिवना नदीपात्रातून रस्ता होऊ शकतो. आज घडीला शिवना नदीमध्ये पुलाखाली अंदाजित सहा ते सात फुटांपर्यंत शिवना टाकळी प्रकल्पाच्या फुगवट्याचे पाणी आहे. हे पाणी एक महिना कालावधीत खाली जाईल तेव्हा शिवना पात्रातून रस्ता होऊन वाहतूक सुरळीत होऊ शकते. तसेच या पुलाच्या पश्चिम बाजूने टापरगावच्या पश्चिमेकडून पूल होण्याअगोदरचा एक जुना रस्ता आहे. काही वृद्ध नागरिकांच्या सांगण्यावरून १९६०पर्यंत हा रस्ता सुरू होता, या रस्त्याला शिवना नदी पात्रातील पाणी संपल्यावर डागडुजी केल्यास येथून ही वाहतूक सुरळीत होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...