औरंगाबाद- संवादिनीच्या सुरातील माधुर्य आणि मृदंग-तबल्याचे नादचैतन्य यांची विलक्षण निर्मिती करत तीन उमद्या कलावंतांनी दर्दी रसिकांची मनस्वी दाद मिळवली. थंडीच्या रविवारी गुलाबी संध्याकाळी तापडिया नाट्यमंदिरात सर्वांगसुंदर मैफल अनुभवण्याची संधी "उपासना'च्या माध्यमातून सर्वांना लाभली.
युवा कलावंतांनी पारंपरिक कलेचे सौंदर्य जपून नवेपणा आणण्याचा केलेला प्रयत्न रसिकांच्या हृदयावर दस्तक देऊन जातो. अनेक मान्यवरांच्या गाजलेल्या संगीत मैफलींना साथ करणारे अभिषेक शिणकर (संवादिनी), सागर पटोकार(तबला) आणि आसाराम साबळे (पखवाज)यांनी वातावरण नादमयी करून टाकले. यमन रागातील जोड, झाला वाजवत त्यांनी मैफलीची सुरेख सुरुवात केली. तिघांचा वादनातील समन्वय जाणकार रसिकांची मनस्वी दाद घेऊन गेला.
तीनतालात विलंबित-मध्य आणि द्रुत वाजवताना क्षणोक्षणी रसिकांची दाद यशाची पावती देणारी होती. या मैफलीतून तिघांनीही दमदार सलामी दिली. िमश्र किरवाणी रागात ठुमरी वाजवत त्यांनी रसिकांची रजा घेतली.
मैफलीचा उत्तरार्ध सजवण्यासाठी पं. नाथराव नेरळकर यांनी स्वरमंचाचा ताबा घेतला. तिन्ही सप्तकात अतिशय चपळाईने स्वरसामर्थ्य दाखवण्याचे त्यांचे कसब पुन्हा एकदा रसिकांच्या वाट्याला आले. राग मालकंसच्या "पग लागन देहो' या विलंबित बडा ख्यालाने त्यांनी गायनाची सुरुवात केली. मालकंसमध्ये त्यांनी सादर केलेल्या भजनाने वातावरण भक्तिमय झाले. या मैफलीच्या आयोजनासाठी सुस्मिरता डवाळकर, गीता व्यास, नेहा देशपांडे, क्षितिजा सहस्रबुद्धे, आदित्य देशपांडे, प्रतीक डवाळकर यांनी सहकार्य केले. युवा कलावंतांना सचिन नेवपूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. उपासना ग्रुपच्या सर्वच सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेत वाटा उचलला.