आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपोवन’मध्ये भिकारी महिलेकडून चार वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: मुंबई ते नांदेड तपोवन एक्स्प्रेसमध्ये भीक मागणाऱ्या महिलेने रविवारी चार वर्षांच्या मुलीला आईजवळून पळवून नेत अपहरण करण्याचा प्रयत्न केला; परंतु वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मुलीची सुटका करण्यात आली. रेल्वेतील प्रवासी मुलीच्या आई-वडिलांनी महिलेला पकडून ठेवत रेल्वे औरंगाबादला पोहोचल्यावर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. 
 
रामेश्वर केंद्रे त्यांची पत्नी मुक्ता आपल्या चार वर्षांच्या किशाेरी दोन वर्षांचा मुलगा रुद्रसोबत कल्याण येथून परभणीला जात होते. रविवारी सकाळी ११ वाजता रेल्वे मनमाड स्थानकावर पोहोचली. तेव्हा मुक्ता यांनी दोन्ही मुलांना बाथरूमला नेले. रुद्रला घेऊन त्या स्वच्छतागृहात गेल्यानंतर किशोरी बाहेरच उभी राहिली. या वेळी भीक मागणारी एक महिला बऱ्याच वेळेपासून तिघांवर नजर ठेवून होती. मुक्ता या रुद्रला घेऊन बाहेर पडत असताना किशोरी आईच्या मागे उभी होती. तेव्हा भीक मागणाऱ्या महिलेने मोठ्या शिताफीने किशोरीचा हात पकडून काही मिनिटांतच डी डब्यातून शेवटच्या डब्यात गेली. किशोरीने आरडाओरड करू नये म्हणून तिच्या अंगावर चादर टाकून तिचे तोंड दाबून ठेवले होते. मुलगी गायब झाल्याचे लक्षात येताच मुक्ता यांनी आरडाओरड सुरू केल्याने रेल्वेतील सर्व प्रवाशांना हा प्रकार माहिती झाला. मुक्ता यांना भीक मागणाऱ्या महिलेवर संशय आल्याने त्यांनी तत्काळ तिचा शोध सुरू केला. तेव्हा चादरीखाली लपवून ठेवलेली किशोरी त्या महिलेजवळ आढळून आली. हा प्रकार लक्षात येताच रेल्वे सुरक्षा बलाचे राजनारायण कणसे घटनास्थळी पोहोचले. रेल्वे सुरू असल्याने महिलेला पळूनही जाता आले नाही. इतर प्रवाशांनी तिला पकडून ठेवले. रेल्वे औरंगाबादला पोहोचताच रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक शर्मा, पोलिस उपनिरीक्षक आनंद बन्सोडे, अन्वर बेग, हेड कॉन्स्टेबल जफर सय्यद, संजय राऊत, पोलिस नाईक चंदू प्रधान, रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी दांपत्याला धीर देऊन महिलेला ताब्यात घेतले. अपहरणाचा प्रयत्न करणारी महिला अनामिका मांझी (४०) हिच्यावर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...