आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tata Sumo Accident At Aurangabad Cidco Child Death

औरंगाबादेत अकरा वर्षांच्या मुलाला चिरडणारी सुमो जाळली; पोलिसांचा लाठीचार्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- हडको कॉर्नरवरील हॉटेल मेट्रोसमोर 11 वर्षे वयाच्या मुलाला टाटा सुमो गाडीने चिरडल्याची घटना रविवारी घडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहून संतापलेल्या जमावाने टाटा सुमो पेटवली. अली सलीम मगदुम असे मृत मुलाचे नाव आहे. सायंकाळी साडेचार वाजता झालेल्या अपघातानंतर परिसरात तासभर तणाव होता. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

एन-13च्या भारतनगरातील चालक बबन मोरे (30) याने बेदरकारपणे वाहन चालवले. दिल्ली गेट- हसरूल टी पॉइंट या मार्गावर सुसाट वाहन चालवताना त्याने पायी जाणार्‍या मुलाला पाहिलेच नाही. गाडीचा वेग एवढा होता की समोरील डिव्हायडरचा अजस्र दगडही रस्त्यावर आला. मुलाला चिरडल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकास जमावाने पकडले. त्यानंतर त्याला बेदम चोप दिला. मद्यपान केल्यामुळे चालकाचे वाहनावर नियंत्रण नव्हते, असे प्रत्यक्षदर्शी सय्यद मुश्ताक यांनी सांगितले.

दरम्यान, जमावाने पांढर्‍या रंगाची सुमो पेटवून दिली. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त सुखदेव चौगुले, सहायक निरीक्षक एम. डी. उस्मान घटनास्थळी आले. जमावाला पांगवण्यासाठी त्यांनी सौम्य लाठीमार केला. अग्निशमन दलाने आग विझविल्यानंतर क्रेनने सुमोचा सांगाडा हलवला. अली सलीमला घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या रस्त्यावर मोठी विद्युत डीपी आल्याने येथे अपघात होतात, असे मौलाना इक्बाल अन्सारी यांनी सांगितले.

वडिलांनी फोडला हंबरडा
मृत मुलाचे वडील सलीम मगदुम चाऊस (45) गंगापूरचे असून आठ महिन्यांपूर्वीच हे कुटुंब हडकोत राहण्यास आले. येथे एका बंगल्यावर पहारेकरी असलेल्या सलीम यांना अपघात मुलाचा असल्याचे कळले तेव्हा त्यांनी हंबरडाच फोडला. जवळच असलेल्या चायनीज सेंटरच्या भिंतीला डोके आपटले. बराच वेळ त्यांच्या तोंडून शब्दही बाहेर पडला नाही.