आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर सल्लागारासह पाच जण अटकेत,अबकारी विभागाचा ७० लाखांचा सेवाकर बुडवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटक करण्यात आलेले आरोपी उल्हास सोनटक्के (सफारीतील) व हारुण खान.
औरंगाबाद - केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचा ६९ लाख ६० हजार ९८६ रुपयांचा सेवाकर बुडवल्याप्रकरणी कर सल्लागारासह चार फर्मच्या मालकांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. सुधाकर तांबडे, हारुण खान, मंगेश तांबडे, दत्तात्रय पाटील व कर सल्लागार उल्हास सोनटक्के अशी आरोपींची नावे आहेत.
चौघांचाही लेबर सप्लायर्सचा व्यवसाय होता. लेबर सप्लायर्स कंपन्यांनी ग्राहकांकडून सेवाकर वसूल केल्याने तो भरणे त्यांना बंधनकारक अाहे. उत्पादन शुल्क विभागात सेवा कर भरण्याच्या नावाखाली उल्हास सोनटक्के (सुंदर रेसिडेन्सी, शहानूरमियाँ दर्गा) कंपन्यांकडून लाखो रुपये घ्यायचा. त्यातील थोडीच रक्कम भरायचा. मात्र त्यापोटी कंपन्यांना पूर्ण पैसे भरल्याच्या पावत्या द्यायचा. हा प्रकार २००८पासून सुरू होता. हारुण खान मोहम्मद अली खानच्या (शरीफ कॉलनी, कटकटगेट) ‘अब्दुल लेबर सप्लायर्स’ने ३० लाख ६६ हजार ७४५
रुपयांचा सेवा कर बुडवल्याचे उघड झाले. सेवा कर अधीक्षक एम. वाय. तिडके यांनी हा प्रकार उजेडात आणला. सोनटक्केने कर भरला नसल्याचा जबाब हारुण खानने नोंदवला होता. त्यानंतर सोनटक्केने संपत्ती विकून रक्कम भरण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी वेळही मागून घेऊन त्यातील काही रक्कमही भरली.

उत्पादन शुल्क विभागाच्या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ही भामटेगिरी उघड झाली. सेवाकर विभागाचे सहायक आयुक्त पी. डी. गोरसे यांनी सोनटक्केसह फर्मच्या मालकांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कुमार संतोष यांनी दिली. त्यावरून या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक राजकुमार डोंगरे तपास करत आहेत.

गैरव्यवहार असा
सोनटक्केने मंगेश तांबडे, सुधाकर तांबडेच्या रेणुका मल्टी सर्व्हिसेसचे ८ लाख ५६ हजार ३६० रुपये व दुसऱ्या फर्मचे १२ लाख ३९ हजार ५८३, दत्तात्रय पाटीलच्या रेणुका एंटरप्रायझेसचा १६ लाख ५० हजार ४७४ रुपये कर भरला नाही. एकूण ६९ लाख ६० हजार ९८६ रु. होतात.