औरंगाबाद - कराबाबत असलेले वाद सोडवून वसुली वाढवण्याऐवजी पोलिसांच्या धमक्या देऊन वसुली का करता, अशी धमकावून वसुली करायला मनपा काही खासगी सावकार आहे का असा सवाल करीत मनपाचे सगळेच पदाधिकारी आज प्रशासनावर तुटून पडले. तुम्ही काम करीत नाही म्हणून आठ दहा वर्षांची थकबाकी होते, पर्यायाने अशा प्रकाराने मनपाची म्हणजे आमचीच बदनामी होते असेही त्यांनी ठणकावले. शेवटी प्रशासनाने वसुली करावी त्यासाठी असे दहशतीचे प्रकार करता कर अदालतींचे नियोजन करावे अशा सूचना महापौरांनी दिल्या.
बड्या व्यावसायिक मालमत्तांची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने या थकबाकीदारांची एक बैठक आज चक्क पोलिस आयुक्तालयात बोलावली होती. हा प्रकार काल उघडकीस आला त्याची काडीचीही कल्पना नसलेले महापौरांसह सारेच पदाधिकारी संतापले. त्यांनी आज सकाळीच साडेनऊ वाजता अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. करवसुलीवरून प्रशासनाला खिंडीत गाठत त्यांच्यावर तोफ डागली जाणार हे स्पष्टच होते.
त्यानुसार सकाळी बैठक सुरू झाली तेव्हा महापौर त्र्यंबक तुपे यांनी विषयाला तोंड फोडले नंतर उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, गटनेते राजू वैद्य, भगवान घडामोडे, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार नासेर सिद्दिकी यांनी प्रशासनावर हल्ला चढवला. प्रशासनाच्या वतीने उपायुक्त अय्युब खान यांनी साऱ्यांना तोंड दिले.
असे झाले आरोप-प्रत्यारोप : करवसुलीसाठीपोलिस आयुक्तालयात बैठक बोलावण्याचे कारण काय, फार तर वसुलीच्या कामासाठी पोलिस बंदोबस्त घेतला असता तर चालले असते, पण आपण वसुलीसाठी सक्षम असताना हे असे दहशतीचे वातावरण का निर्माण करता असा सवाल सगळ्यांनीच केला. मागची आठ - दहा वर्षे एवढी थकबाकी तुंबली कशी, आजची वेळ येऊ देण्यास कोण दोषी आहे असा प्रश्न करीत पदाधिकारी म्हणाले की, आपण वसुली करू शकत नाही म्हणून पोलिसांची मदत घ्यावी लागते यात मनपाची पर्यायाने आम्हा सगळ्यांची बदनामी अाहे. असे धंदे करू नका. जे नियमित पैसे देतात त्यांनाच तुम्ही ओरबाडत असता, जे कधीच कर भरत नाहीत त्यांचे काहीच करत नाही असा आरोप त्यांनी केला. हा प्रकार बंद करणे गरजेचे असल्याचे या वेळी सांगण्यात आले. अखेरीस महापौर तुपे म्हणाले की, आधी नागरिकांचे वाद सोडवा, त्यांच्याशी बोला, आम्ही सगळे पदाधिकारी सोबत राहून काम करू. लोक अदालतीचे उद्याच नियोजन करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करा असे निर्देश त्यांनी दिले.
आयुक्तांची गैरहजेरी
काल सायंकाळी पोलिस आयुक्तालयातील बैठकीची माहिती समजताच संतापलेल्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळीच बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलण्यासाठी महापौर तुपे यांनी आयुक्तांना फोन लावले, पण त्यांनी फोन घेतलेच नाही. रात्री उशिरा आयुक्तांनी फोन लावला तर महापौर कार्यक्रमात असल्याने त्यांचे बोलणे होऊ शकले नाही. शेवटी आयुक्तांच्या स्वीय सहायकांकडे बैठकीचा निरोप देण्यात आला. पण सकाळी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया बैठकीला आलेच नाहीत. त्यांची अनुपस्थिती खूपच बोलकी होती.