आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tax Exaction Issue Of Aurangabad Municipal Corporation

करवसुली ढेपाळली विकासकामे धोक्यात, महापौर, सभापतींचे आयुक्तांना नाराजीचे पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सर्वांना खुश करण्यासाठी अर्थसंकल्प फुगवताना करवसुलीचे टार्गेट वाढवणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आता आपणच दिलेले टार्गेट अशक्य असल्याचे दिसू लागताच वसुली समाधानकारक होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करणे सुरू झाले आहे. आधी महापौर त्र्यंबक तुपे यांनी ही नाराजी व्यक्त केली, तर आता स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांनी आयुक्तांना पत्र देत आपली नाराजी व्यक्त केली.
निवडणुकी नंतरचे पहिले आर्थिक वर्ष नगरसेवकांसाठी निराशेचे गेले असून कामेच झाली नसल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. आधी तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांच्यासोबतच्या संघर्षात बराच मोठा काळ निघून गेला. त्यानंतर आलेल्या सुनील केंद्रेकर यांनी तिजोरीची तब्येत ओळखून निर्णय घेतल्याने चांगलीच अडचण झाली आहे. महाजन प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करून काम करणारे आयुक्त बदला अशी मागणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आता तिजोरी पाहून कामांना चाप लावणाऱ्या सुनील केंद्रेकरांच्या विरोधात ब्र काढणेही संकटात टाकणारे आहे.
आर्थिक वर्ष संपायला फक्त अडीच महिने बाकी आहेत. २३० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असताना प्रत्यक्ष वसुली कशीबशी ५० कोटींचा पल्लाच गाठू शकली. आता उरलेल्या अडीच महिन्यांत उद्दिष्टपूर्ती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे विकासकामांवर त्याचा परिणाम होणार आहे.
मध्यंतरी आयुक्त केंद्रेकरांनी प्रत्येक नगरसेवकाची एक-दोन अत्यावश्यक कामे निश्चित केली जातील, असे सांगितले असले तरी त्याचाही खर्च करणे मनपाला अवघड जाणार आहे. काही नगरसेवकांनी आपापल्या वाॅर्डातील अत्यावश्यक कामांची यादीही केली असली तरी त्यांना चाचपणीदरम्यान ही कामे होतील याची हमी मिळत नसल्याने ते नाराज झाले आहेत. त्यामुळे कामे होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यासाठी पदाधिकारी आता वसुलीचे उद्दिष्ट पुरे होत नसल्याचे कारण दाखवत आहेत.

गेल्या आठवड्यात महापौर त्र्यंबक तुपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्तांनी वसुली वाढवण्याची गरज असल्याचे सांगत सध्याचे वसुलीचे चित्र फारसे समाधानकारक नसल्याचे म्हटले होते. महापौरांची नाराजी ताजी असतानाच स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांनीही तसाच सूर आळवला आहे.

उद्दिष्ट फुगवले
प्रशासनाने १८० कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. स्थायी समितीने ते २३० कोटींचे केले होते. पण वसुली समाधानकारक नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. थोरात यांनी एका अर्थाने आपणच उद्दिष्ट फुगवल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.