आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tax News In Marathi, Queues For Property Taxes, Divya Marathi

मालमत्ता कर भरण्यासाठी रांगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आर्थिक वर्ष संपण्याच्या आत मालमत्ता कर भरण्यासाठी मनपाच्या कार्यालयांत नागरिकांनी रांगा लावल्या. काही ठिकाणी मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे मागील वर्षांच्या नोंदीतील घोळ, त्यावरून वादावादी, असे प्रकारही पाहायला मिळाले. आज रविवार असूनही कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. दुसरीकडे ऑनलाइन करभरणा करणार्‍या 1050 मालमत्ताधारकांना मनपाने 1 टक्का सूट जाहीर केली आहे.
मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मनपाने मोहीम सुरू केली आहे. याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. रविवारीही कार्यालय सुरू राहणार असून नागरिकांनी मालमत्ता कर भरावा, असे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनी सकाळी 9 वाजेपासून स्वयंस्फूर्तीने करभरणा केला. काही कार्यालयांत दोनशे मीटरपर्यंत नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. आर्थिक वर्षातील उद्याचा शेवटचा दिवस असल्याने मनपाकडून जास्तीत जास्त कर वसूल करून उत्पन्न वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. सिडको कार्यालय, एन-2 रामनगर आणि पटियाला बँक येथे सकाळी 9 ते रात्री सहा वाजेपर्यंत कर भरण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. सिडकोने 29 मार्च 2014 पर्यंत 18 कोटी 99 लाख रुपये सर्वाधिक मालमत्ता कर वसूल केला. 30 मार्च रोजी सुमारे 15 लाख, रामनगरमधून 2 लाख आणि पटियाला बँकेत 4 लाख कर जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. वॉर्ड ड कार्यालयातही दिवसभर नागरिकांची गर्दी होती. याशिवाय इतर वॉर्ड कार्यालयांत रांगा लावून करभरणा करण्यात आला.
मनपाच्या रजिस्टरमधील नोंदी आणि संगणकातील नोंदी यांचा घोळ संपला नसून त्याचा परिणाम म्हणून कर भरायला आलेल्या नागरिकांना किमान पाऊण तास खर्ची घालून नोंदी तपासून करभरणा करावा लागत होता. करही नागरिकांनीच भरायचा, भरला की नाही याच्या नोंदीही आपणच ठेवायच्या, असा मनपाचा कारभार त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
28 गाळ्यांचा लिलाव होणार : करभरणा न करणार्‍या आणि कराबाबत काही शंका अथवा म्हणणे असल्यास प्रत्यक्ष हजर होण्यास सांगूनही न आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळेधारकांच्या 28 गाळ्यांचा लिलाव करण्याचे आदेश आज आयुक्त डॉ. कांबळे यांनी जारी केले. या 28 व्यापार्‍यांना मनपाने 31 मार्चपर्यंत थकीत कर भरण्याचे आवाहन करीत कराबाबत शंका अथवा म्हणणे असल्यास 30 मार्च रोजी कर निर्धारक व संकल शिवाजी झनझन यांना 12 ते 2 या वेळात भेटण्याचे आवाहन करण्यात आले होते. तथापि 28 पैकी एकही गाळेधारक तिकडे फिरकला नाही आणि करही भरला नाही. अखेर मनपा आयुक्तांनी महाराष्ट्र महानगरपालिकेतील तरतुदीनुसार या गाळळ्यांचा लिलाव करण्याबाबत पुढील प्रक्रिया करण्याचे आदेश दिले.