आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षयग्रस्त महिलेस उपचाराची प्रतीक्षा; मुलाने सोडले वार्‍यावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अर्धेअधिक शरीर लुळे पडलेल्या व नातेवाइकांनी वार्‍यावर सोडलेल्या महिलेवर उपचारासाठी घाटीमध्ये टोलवाटोलवी होत आहे. जवळपास महिनाभर उपचार करूनही कुठलाही विशेष फरक न पडलेल्या महिलेला बेजबाबदारपणे सोडून देण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.
11 जुलै रोजी अलका पवार या पन्नाशीतल्या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा कमरेखालचा भाग पूर्णपणे लुळा पडला होता. चालणे सोडा, तिला उठून बसणेही शक्य नव्हते. अपघात विभागातून तिला मेडिसिन विभागात दाखल करण्यात आले. दरम्यानच्या काळात रुग्ण सहायता केंद्राच्या निधीतून महिलेची एमआरआय तपासणी करण्यात आली. त्यात तिला मणक्याचा आजार असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेला तातडीने अस्थिव्यंगोपचार विभागात स्थलांतरित करणे गरजेचे होते. मात्र, तब्बल पंधरा दिवसांनंतर 25 जुलै रोजी तिला स्थलांतरित करण्यात आले. मणक्याचा टीबी असल्याचे लक्षात येऊनही तिला 2 ऑगस्टला खासगी अँम्ब्युलन्समधून शहानूरमियाँ दर्गा परिसरात अतिशय बेजबाबदारपणे सोडण्यात आले. ही महिला बेवारस स्थितीत सापडल्यानंतर पोलिसांनीच पुन्हा 3 ऑगस्टला अपघात विभागात दाखल केले. 4 ऑगस्टला तिला मेडिसिन विभागातील वॉर्ड क्रमांक 202 मध्ये दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी सुक्रे म्हणाले की, अलका पवार या महिलेला मणक्याचा टीबी आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. त्यांना किमान सहा महिने उपचार करावे लागणार आहेत. एवढय़ा दिवस त्यांना घाटीत दाखल करण्याची गरज नाही. त्यामुळे झाल्टा फाटा येथील त्यांच्या मुलाच्या घरी खासगी अँम्ब्युलन्समध्ये नेण्यात आले. त्यांच्यासोबत एक चतुर्थर्शेणी कर्मचारी देण्यात आला होता. मात्र, मुलाने घरी न ठेवता शहरातील शहानूरमियाँ दर्गा परिसरात रूम घेणार असल्याचे सांगून तिथे सोडण्यास सांगितले. मुलगा स्वत: अँम्ब्युलन्समध्ये बसला होता. त्यामुळे महिलेला शहानूरमियाँ दर्गा परिसरात सोडण्यात आले. मात्र, त्यानंतर मुलगा त्या महिलेस सोडून गेला असावा, असे डॉ. सुक्रे यांनी सांगितले. आता आम्ही पोलिसांना महिलेस घेऊन जाण्याविषयी कळवणार असल्याचे ते म्हणाले.
अनेक प्रश्न अनुत्तरित
महिलेला काहीच फरक पडलेला नसताना तिला का सोडण्यात आले? घाटीमध्ये स्वतंत्र टीबी विभाग असताना तिथे तिच्यावर उपचार का करण्यात आले नाहीत ? महिलेवर एका विभागातून दुसर्‍या विभागात उपचारासाठी टोलवाटोलवी का करण्यात आली? अशा रुग्णांवर थातूरमातूर उपचार करून सोडून देण्यात आल्याचे प्रकार मागेही घडले आहेत. याबाबत निश्चित नियोजन दिसून येत नाही. मुलगा मातेचे पोलनपोषण करण्यास तयार नाही हे लक्षात येत असताना तिला बेजबाबदारपणे कसे काय सोडण्यात येते, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.