आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teach Hyderabad Freedom Struggle In Schools, Uddhav Appeal To Municipal Incumbent

शहर खड्डेमुक्त करा : मुक्तिसंग्राम संग्रहालयाचे उद्घाटना प्रसंगी उद्धव ठाकरेंचा आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेना येथे सत्तेत आहे, राज्यात सरकार आपले आहे. हे शहर खड्डेमुक्त करा, कोणत्या योजनेतून पैसे आणता येतील ते पाहा, पण शहराला न्याय द्या, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनपा पदाधिकाऱ्यांना आदेश दिले.

सिद्धार्थ उद्यानात मनपाने पावणेआठ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या मुक्तिसंग्राम संग्रहालयाचे रविवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्््घाटन झाले. या वेळी व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, मनपा आयुक्त प्रकाश महाजन, आमदार संजय शिरसाट, आमदार अतुल सावे, आमदार विनोद घोसाळकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी मुक्तिसंग्राम स्मारक स्तंभाला अभिवादन केल्यानंतर ठाकरे यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मनपा निवडणुकीचा संदर्भ देत शहराच्या खड्डेमुक्तीचा अजेंडा पदाधिकाऱ्यांना दिला.
ते पुढे म्हणाले, मनपाच्या तिजोरीत खडखडाट असताना खासदार राजकुमार धूत, पालकमंत्री कदम यांनी दिलेल्या निधीमुळे स्मारकाचे काम उभे राहिले. मराठवाड्याची अस्मिता असणाऱ्या लढ्याचे हे स्मारक असून येणाऱ्या पर्यटकांना मराठवाडा ही फक्त संतांची नव्हे तर क्रांतिकारकांची भूमी आहे हे कळू द्या.

पुन्हा संभाजीनगरचा नारा
ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर मुक्तिसंग्रामाचा संदर्भ देत औरंगाबादचे संभाजीनगर करा, अशी मागणी केली. आता आपले सरकार आहे, आपल्या सगळ्या मंत्री व आमदारांना असा ठराव घेऊन त्याला केंद्राची मंजुरी घ्या, अशा सूचनाही केल्या. बेळगावचे बेळगावी होऊ शकते तर औरंगाबादचे संभाजीनगर का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. विमानतळाला छत्रपती संभाजी राजे विमानतळ असे नाव दिलेच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. त्याआधी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी संग्रहालयासाठी लागेल ती मदत करू, असे सांगितले. शहराच्या विकासासाठी प्रयत्न करताना वाहतुकीची समस्या सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले. पुढील ५० वर्षांची गरज ध्यानात घेऊन रस्ते, पूल तयार करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, आयुक्त प्रकाश महाजन यांचीही भाषणे झाली. या वेळी खासदार संजय जाधव, आमदार संदिपान भुमरे, अर्जुन खोतकर, हर्षवर्धन जाधव, उपमहापौर संजय जोशी, स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सुहास दाशरथे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, नंदकुमार घोडेले, भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात संग्रहालयासाठी अथक परिश्रम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला तर स्वातंत्र्यसैनिक काशिनाथ नावंदर, लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल, ना. वि. देशपांडे, रतीलाल जरिवाला, गोविंदराव सोंदे यांचा सत्कार करण्यात आला.
अर्धवट रस्त्याचे उद्््घाटन : निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या वतीने शहरातील क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या अपूर्ण राहिलेल्या सिमेंट रोडचे उद््घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी ५.४० वाजता करण्यात आले. या रस्त्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग असे नाव देण्यात आले असून नामफलक व फीत कापून रस्त्याच्या वाहतुकीचा शुभारंभ केला. त्यानंतर तत्काळ रेल्वे स्टेशन रस्त्याने गाड्यांचा ताफा निघून गेला. या वेळी पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, किशोर नागरे, विजय वाघचौरे, अंबादास दानवे, राजू वैद्य, विकास जैन, सुशील खेडकर, बाळू थोरात, राजू दानवे, सचिन खैरे, घोसाळकर आदींची उपस्थिती होती.