आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार आणि कंटेनरच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू, घातपाताचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - औरंगाबाद-नगरमहामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर शनिवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास भरधाव कार कंटेनरवर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये कारमधील शिक्षक राहुल अरविंद महामुनी (३०, रा.महूद, ता.सांगोला) यांचा जागीच मृत्यू झाला, तर गिरीश गायकवाड (२७ ) प्रकाश गायकवाड (५२, दोघेही रा.कडलास, ता.सांगोला, जि.सोलापूर) हे पिता-पुत्र जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर कंटेनरचालक कंटेनरसह घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, घटनेचा सर्व प्रकार लगतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 
 
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल महामुनी गिरीश गायकवाड हे सोलापूर जिल्ह्यातील एका खासगी संस्थेवर गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, दोघा शिक्षकांना अचानक नोकरीवरून कमी करण्यात आले. बेकायदेशीररीत्या नोकरीवरून कमी केल्यामुळे न्यायालयीन लढा देण्यासाठी औरंगाबाद येथील एका प्रसिद्ध वकिलाची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी निघालेल्या दोघा शिक्षकांनी सोबत संस्थेचे पदाधिकारी असणारे गिरीश यांचे वडील प्रकाश गायकवाड यांना सोबत घेतले. हे तिघेजण शुक्रवारी रात्री सोलापूरहून कारने (एमएच ४५ एन ७५८०) औरंगाबादला येण्यासाठी निघाले. दरम्यान, शुक्रवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास त्यांची कार पंढरपूर कामगार चौकालगतच्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर येताच समोरील कंटेनरला कारची पाठीमागून जोरात धडक लागली. या धडकेत समोरील चालकाशेजारी बसलेले शिक्षक राहुल महामुनी यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक शिक्षक गिरीश गायकवाड मागे बसलेले त्यांचे वडील प्रकाश गायकवाड हे जखमी झाले. पोलिसांनी जखमींना घाटीत रवाना केले. 
 
अपघात नाही, हा तर घातपात 
मृत शिक्षकाच्या भावाने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात भेट देऊन भावाचा अपघात झाला नसून तो घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप करत त्या दृष्टिकोनातून तपास करण्याची मागणी केली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...