आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teacher Efforts Give School A ISO Mark, Waiting For Admission

गुरुजनांमुळे झेडपी शाळेला आयएसओ, प्रवेशासाठी वेटिंग!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: वर्षभरापूर्वी मोडकळीला आलेल्या एकोड शाळेचे आवार असे बहरले आहे.
औरंगाबाद - गुरुजनांनी मनावर घेतले तर काय करू शकतात याचा वस्तूपाठ घालून देण्याचे काम औरंगाबाद जिल्ह्यातील एकोडच्या जिल्हा परिषद शाळेने केले आहे. पुरेशा विद्यार्थीसंख्येअभावी वर्षभरापूर्वी बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या या शाळेने स्तुत्य भरारी घेत आयएसओ प्रमाणपत्र मिळवले. गतवर्षी जूनमध्ये बदलून आलेले मुख्याध्यापक जी.ई. तळेकर आणि त्यांच्या सहका-यांच्या इच्छाशक्तीतून हे साध्य झाले असून, आता सोडून गेलेल्या ३२ विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेत प्रवेश घेण्यासाठी नोंदणी केली आहे.

चार वर्षांपूर्वी औरंगाबादजवळच्या सातारा येथील जि.प. शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले होते. आता शहरापासून २० कि.मी.वर असलेल्या ४५० लोकवस्तीच्या एकोडा गावाने हा मान मिळवला. बीड बायपास ओलांडून आडगाव बुद्रुक, पुढे चिंचोली आणि एकोडा आहे. गुरुजनांना आयएसओच्या निकषापलीकडे गुणवत्ता पोहोचवण्यात यश मिळाले आहे.
गुरुजींच्या प्रयत्नांना ग्रामस्थांचे पाठबळ
डबघाईला आलेल्या शाळेत येताच मुख्याध्यापक तळेकर यांनी डी. जे. पवार, बी.के. डिवटे, वाय.एस. काकडे या शिक्षकांना सोबत घेतले. मिळणा-या पगारातून वर्गणी जमवली. मुख्याध्यापकांचे ५०, शिक्षकांचे १५ हजार असे पैसे जमले. शाळेची डागडुजी, रंगरंगोटी झाली. झाडे लावली. या उपक्रमात उपसरपंच अशोक शिंदे सहभागी झाले. पालकसभा बोलावली. ग्रामस्थ व दानशूर व्यक्तींनी निधी दिला. शाळेचे रंगरूप पालटले. गेल्या २९ जानेवारी रोजी आयएसओ प्रमाणपत्र मिळाले. यात गटविस्तार अधिकारी अनिल पवार यांचाही मोठा वाटा होता.
व्हर्जन....
..तर आयएसओ शाळांचा तालुका
ऐकोडच्या मुख्याध्यापकांनी परिश्रमाने शाळेचा कायापालट घडवला. यातून इतर शाळा प्रेरणा घेतील. तालुकाच आयएसओ शाळांचा तालुका म्हणून पुढे येईल.
प्रियाराणी पाटील, गटशिक्षण अधिकारी, औरंगाबाद
इतरांना मार्गदर्शन करणार
आमची शाळा सरस केली. खासगी स्पर्धेत उतरतील अशा पद्धतीने शाळा करण्यासाठी इतरांनाही आम्ही मार्गदर्शन करणार आहोत.
जी. ई. तळेकर, मुख्याध्यापक, ऐकोडी शाळा
कायम सहकार्य करू
बंद पडण्याच्या स्थितीतील शाळा मुख्यध्यापकांच्या पुढाकाराने पायावर उभी राहिली. आमचे शाळेला कायम सहकार्य राहील.
अशोक शिंदे, उपसरपंच, एकोडी
आम्हाला 'गुरु' देव मिळाले
मुलांना दर्जेदार शिक्षण हे इतक्या छोट्या गावात मिळेल अशी शक्यता वाटत नव्हती. मात्र मुख्याध्यापक व शिक्षकांच्या रूपाने आमच्या गावात गुरुदेवच आले.
सिंदुताई केदार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष