आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ मारकुट्या शिक्षिकेचा अहवाल पोलिसांनी मागवला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिक्षिकेने कानशिलात मारल्याने विद्यार्थ्याचा कान निकामी झाल्याच्या निंदनीय कृत्यानंतरही सेंट जॉन शाळेच्या प्रशासनाने धडा घेतला नाही. उलट मग्रुरीचे प्रदर्शन करत उपचाराचा खर्च देण्यास संस्थेने नकार दिला आहे. या कृत्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेने संस्थेविरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सिडको पोलिसांनीही या घटनेचा तसेच मारहाण करणार्‍या शिक्षिकेचा अहवाल संबंधित शाळेकडून मागवला असून त्यानंतर तपास केला जाणार आहे.

प्रशांत फुके या विद्यार्थ्याला मारहाण करणारी शिक्षिका प्रेमलता साळवे हिला सिडको पोलिसांनी गुरुवारी (14 मार्च) अटक केली होती. न्यायालयाने तिची जामिनावर मुक्तता केली आहे. शुक्रवारी पोलिसांनी शाळा व्यवस्थापनाला पत्र दिले असून साळवे हिच्या वर्तणुकीचा अहवाल मागितला आहे. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे. शिक्षिकेने प्रशांतला मारहाण केली तेव्हा उपस्थित विद्यार्थी आणि काही शिक्षकांचे जबाब पोलिस नोंदवणार आहेत.
संस्थेची मग्रुरी सुरूच : प्रशांतचा कान निकामी होऊनही सेंट जॉन संस्था किंवा कोणत्याही शिक्षकाने त्याची साधी विचारपूसही केली नाही. शाळेत जणू काही घडलेच नाही, अशा तोर्‍यात संस्था वागते आहे.

या घटनेबाबत संस्थाचालकासह कोणताही शिक्षक बोलण्यास तयार नाही. शुक्रवारी काही वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि संघटनांचे पदाधिकारी शाळेत गेले असता त्यांनाही गेटवरच रोखण्यात आले. संचालक किंवा प्रिन्सिपॉल बोलायलाही तयार नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा आंदोलनाचा इशारा : प्रशांतला झालेल्या मारहाणीची बातमी दै. ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने हे प्रकरण उचलून धरले आहे. संघटनेचे कार्यकर्ते शुक्रवारी दुपारी शाळेत पोहोचले. प्राचार्यांना निवेदन देऊन प्रशांतच्या उपचाराचा खर्च संस्थेने उचलावा आणि दहावीपर्यंत त्याची फी माफ करावी, अशी मागणी केली.

या मागण्या दोन दिवसांत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष उमर फारुकी यांच्या नेतृत्वाखाली संदीप पाचगे, सुमीत जाधव, गौस पठाण, रवी पाटील, विशाल जोगदंड, नीलेश काळे, राजू बनकर यांनी गेटसमोर निदर्शने केली.

मुलाच्या उपचाराचा खर्च संस्थेने करावा
''माझ्या मुलाला शिक्षिकेने मारहाण केली. या शिक्षिकेला संस्थेने नियुक्त केले आहे. यात संस्थेची चूक आहे. मारहाणीमुळे माझ्या मुलाला अपंगत्व आले आहे. त्याच्या उपचाराचा आणि दहावीपर्यंत शिक्षणाचा खर्च संस्थेने उचलावा.''
-हरिदास फुके, वडील