आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teacher Less Government College News In Marathi, Divya Marathi

शिक्षकांअभावी कॉलेजचे चित्र बिघडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महान चित्रकार घडवण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयाचे रंग शिक्षकांअभावी उडाले आहेत. महाविद्यालयातील तब्बल चार अभ्यासक्रम, 16 वर्ग आणि 300 हून अधिक विद्याथ्यांची मदार केवळ 6 अधिव्याख्यात्यांच्या खांद्यावर आली आहे. एकेका गुरुजींकडे सरासरी 3 वर्गांची जबाबदारी पडली आहे. एका अभ्यासक्रमासाठी तर केवळ एक अधिव्याख्याता असून त्यास 6 वर्गांचा कार्यभार सांभाळावा लागतो. राज्यातील तिन्ही कला महाविद्यालयांचे हेच विदारक चित्र आहे. यामुळे भविष्यातील कलाकार कसे घडतील, असा प्रश्न निर्माण होतोय.

मराठवाड्यासारख्या मागास विभागात कलेचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि त्यातून भविष्यातील चित्रकार घडावेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून औरंगाबादेत शासकीय कला महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. पूर्वी किल-ए-अर्क परिसरातील ऐतिहासिक जनाना महाल या ठिकाणी हे महाविद्यालय होते. 13 ऑगस्ट 1971 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. पुढे या महाविद्यालयाला तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाची संलग्नता मिळाली, तर 2004 मध्ये ते आताच्या नवीन व भव्य वास्तूत हलवण्यात आले. वास्तू नवीन होती; पण येथे वर्षानुवर्षे काम करणारे शिक्षकवृंद जुनेच होते. ते एक एक करून निवृत्त होत गेले. नवीन कोणी आलेच नाही. परिणामी भव्य, चकचकीत वास्तूत मार्गदर्शक नसल्याने स्वत:च ज्ञानार्जन करण्याची वेळ आली आहे.

16 वर्ग, 300 विद्यार्थी
राज्य शासनाच्या उच्च व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कला संचालनालयातर्फे महाविद्यालयाचा कारभार चालतो. राज्यात या अभ्यासक्रमाची तीन शासकीय महाविद्यालये आहेत. मुंबईत सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, नागपुरात चित्रकला महाविद्यालय, तर औरंगाबादेत शासकीय कला महाविद्यालय अशा तीन महाविद्यालयांचा समावेश होतो. येथील महाविद्यालयात बॅचलर इन फाइन आटर््स (बीएफए), मास्टर इन फाइन आर्टस (एमएफए), टेक्सटाइल आणि एटीडी असे चार अभ्यासक्रम चालतात. पदवी स्तराचा अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे, तर एटीडी आणि एमएफए प्रत्येकी दोन वर्षांचे अभ्यासक्रम आहेत.
  • बीएफएचे अ‍ॅप्लाइड आर्ट आणि पेंटिंगचे असे प्रत्येकी चार म्हणजेच एकूण 8 वर्ग चालतात.
  • एमएफए प्रथम व द्वितीय वर्षाचे मिळून 2 वर्ग चालतात.
  • टेक्स्टाइलच्या चार वर्षांचे मिळून 4 वर्ग
  • एटीडीचे 2 वर्षांचे 2 वर्ग चालतात.
  • सर्व मिळून येथे एकूण 16 वर्ग चालतात, तर सरासरी 300 ते 315 विद्यार्थी आहेत.
फक्त 6 अधिव्याख्याता
महाविद्यालयात अधिव्याख्यात्यांची एकूण 26 मंजूर पदे आहेत; पण यातील बरीच मंडळी टप्प्याटप्प्याने निवृत्त होत गेली. यामुळे आता येथे केवळ 6 कायमस्वरूपी अधिव्याख्याता उरले आहेत. अ‍ॅप्लाइडसाठी दोन जणांची नेमणूक आहे. यात डीनसह एका जणाचा समावेश आहे. डीनकडे इतर प्रशासकीय कामांचा बोजा असतो तरी ते अध्यापन करतात. पेंटिंगची स्थिती तर अधिकच वाईट असून एक जणच असल्यामुळे त्यास 6 वर्गांत शिकवावे लागते. एटीडीला एक शिक्षक असून ते 2 वर्गांची जबाबदारी सांभाळतात. टेक्स्टाइलला एका अस्थायीसह 2 शिक्षक असून ते 4 वर्गांना शिकवतात. एकूण वर्ग व शिक्षकांचा हिशेब केला तर एका अधिव्याख्यात्याकडे 3 वर्गांची जबाबदारी येते. शिक्षकेतर कर्मचा-यांची 8 पदे मंजूर आहेत; पण प्रत्यक्षात येथे केवळ 3 जण कार्यरत आहेत. यामुळे या तीन कर्मचा-यांवर कामाचा प्रचंड ताण पडतो. कला क्षेत्रासाठी ही कमतरता परवडणारी नाही.
ग्रामीण शाळेसारखी स्थिती
शासनाच्या वतीने चालवल्या जाणा-या या महाविद्यालयाची स्थिती ग्रामीण भागातील शाळेसारखी झाली आहे. तेथे एका शिक्षकावर 4-5 वर्गांची जबाबदारी असते. येथेही असेच होत आहे. हे सर्व अभ्यासक्रम पूर्णवेळ आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वर्ग सुरू असतात. लेक्चरपेक्षा प्रात्यक्षिकांवर भर असतो. एक असाइनमेंट पूर्ण करायला 6-7 तास लागतात. विद्यार्थ्यांना हे काम करताना शिक्षकांचे मार्गदर्शन आवश्यक असते. फोटोग्राफी, पोर्ट्रेट यांसारख्या विषयात ज्यांचे स्पेशलायझेशन आहे त्यांनाच तो शिकवता येऊ शकतो. शाळेच्या शिक्षकांसारखे एकाच शिक्षकाला सर्व विषय शिकवता येत नाहीत. मात्र, एकेका गुरुजींवर अनेक वर्गांची जबाबदारी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिक्षक एका वर्गात एक असाइनमेंट देऊन दुस-या वर्गात जातात. तेथे मॉडेल बसवून परत तिस-या वर्गात जातात. त्या विद्यार्थ्यांना त्या विषयातील परिपूर्ण ज्ञान मिळतच नाही.

कंत्राटींनाही व्हाइट वॉश
या कमतरतेवर उपाय म्हणून कंत्राटी अधिव्याख्याता नेमण्याचा पर्याय शासनाने स्वीकारला. त्यांच्या नेमणुकीसाठी दरवर्षी कला संचालनालयाकडून संबंधित महाविद्यालयांना यादी प्राप्त होते. त्यानुसार बाँड करून दरवर्षी कंत्राटी अधिव्याख्यात्यांची नेमणूक केली जाते. राज्यात अशा प्रकारचे 48 अधिव्याख्याते आहेत. पैकी 7 औरंगाबादेत नेमले जातात. साधारणपणे शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या महिनाभरापूर्वी या नेमणुका केल्या जातात. काही जण 10 ते 12 वर्षांपासून कंत्राटी म्हणून काम करत आहेत. यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अध्यापन करणे सोपे जाते. यंदाचे वर्ष 16 जून रोजी सुरू झाले, परंतु अद्यापही कंत्राटी अधिव्याख्यात्यांच्या नेमणुका झालेल्या नाहीत. त्यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
राज्याचा कॅन्व्हासही कोराच
औरंगाबादप्रमाणेच मुंबई आणि नागपुरातील कला महाविद्यालयातही हीच परिस्थिती आहे. या तीन महाविद्यालयांतील 60 टक्के अधिव्याख्यात्यांची पदे रिक्त आहेत. तीन महाविद्यालये मिळून अधिव्याख्यात्यांची जवळपास 115 मंजूर पदे आहेत. पैकी केवळ 27 अधिव्याख्यातेच कार्यरत आहेत. अन्य 15 जणांची हंगामी अधिव्याख्याते म्हणून नियुक्ती आहे. अन्य 73 पदे रिक्त आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, श उच्च् व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांची मुलाखत