आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक आमदार प्रश्न सोडवण्यात अपयशी, विरोधी पक्षनेते विखे पाटलांचा विक्रम काळेंना टोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिक्षकांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठवाड्यातील शिक्षक आमदार विक्रम काळे यांना टोला लगावला. शिक्षक आमदार शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात कमी पडल्याचे ते म्हणाले. अर्थात त्यांनी विक्रम काळे यांचा नामोल्लेख त्यांनी टाळला.

शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोरील आंदोलक शिक्षकांची मंगळवारी विखे यांनी भेट घेतली. सध्याचे निम्मे मंत्रिमंडळ भानगडबाज असल्याचा आरोप करतानाच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच राज्यात मध्यावधी निवडणूक होऊ शकते, असा दावा त्यांनी केला. एकमेकांवर आरोप करणारे हे सूर्याजी पिसाळांचे सरकार असून ते जास्त दिवस टिकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी विखे यांनी केली. काँग्रेसचे सरकार असते तर आम्ही केव्हाच या संस्थेवर बंदी घातली असती. या संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आमच्याच सरकारने पाठवला होता. परंतु त्याचे पुढे काही झाले नाही, असेही ते म्हणाले. डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीला कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती. महाराष्ट्र पोलिस फक्त कारवाई केल्यासारखे दाखवत असल्याचाही आरोप त्यांनी केला. या वेळी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेव पवार, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रसिद्धीसाठी आरोप
विखे यांनी आरोप करताना अभ्यास करायला हवा होता. शिक्षक आमदार हा शिक्षकांचे प्रश्न मांडतो. ते सोडवण्याचे काम हे सरकारचे असते. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी विखे यांनी असा आरोप केला असावा असे मला वाटते. त्यातच मंगळवारीच सरकारने शिक्षकांची समस्या सोडवली. त्याकडेही विखे यांचे लक्ष गेलेले नाही. त्यांनी विरोधी पक्षनेते या नात्याने प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायला हवे. - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस.