आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teacher Sandeep Kulkarni Teach To Kazakhstan Students

औरंगाबादचा तरुण शिक्षक देणार कझाकिस्तानातील शाळेत धडे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- इंजिनिअर किंवा डॉक्टर होऊन परदेशात जाण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात. मात्र हडकोत राहणाऱ्या संदीप कुलकर्णी याने शिक्षक म्हणून परदेशात जाण्याचे स्वप्न २००९ मध्ये पाहिले आणि ते सत्यात उतरवले. कझाकिस्तानमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी जगभरातील २२ शिक्षकांची निवड करण्यात आली, त्यात संदीप कुलकर्णीचा समावेश आहे.
कझाकिस्तानातील शासनाच्या सर्व शाळांमध्ये यापुढे आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञानावर भर दिला जाणार आहे. तेथे शिकवण्यासाठी संदीपची निवड झाली आहे. बळीराम पाटील विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सामान्य घरातील या तरुणाने एमसीएम ही संगणक अभ्यासक्रमातील पदवी घेतली. मुंबईत चांगली नोकरीही त्याला मिळाली. मात्र शिक्षक होण्याची आवड असलेल्या संदीपचे मन त्यात रमले नाही. त्याची आई प्रफुल्लता कुलकर्णी या हडकोतील बालविकास विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका होत्या तर वडील नारायण कुलकर्णी हे जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात होते.
बहीण संगीताही शिक्षिका म्हणूनच काम करते. घरातील पोषक वातावरण संदीपला खुणावत होते. म्हणून त्याने एमसीएमनंतर बीएड केले आणि आईच्या शाळेत शिकवण्यास सुरुवात केली. त्या वेळीही त्याने शाळेत वेगवेगळे प्रयोग केले. पायोनियर्स सेकंडरी स्कूलची सूत्रे त्याने सांभाळली. मराठी विज्ञान परिषदेचा एक तरुण सदस्य म्हणूनही तो काम करतो. परदेशातील शाळेत शिक्षक व्हायची उत्सुकता संदीपला होती. प्रयत्नपूर्वक त्याने ते स्वप्न पूर्ण केले.
टीव्ही सेंटरच्या इंटरनेट कॅफेवर बसून दिली पहिली मुलाखत : परदेशातशिक्षक म्हणून जाण्यासाठी संदीपला खूप प्रयत्न करावे लागले. बालविकास विद्यामंदिरात शिक्षक म्हणून काम करताना परदेशातील शाळांसाठी मुलाखती देणे सुरू होते. मलेशियातील क्वालालंपूर येथील एका शाळेसाठी शिक्षक म्हणून त्याची मुलाखत झाली. टीव्ही सेंटर चौकातील एका इंटरनेट कॅफेवर बसून त्याने ही मुलाखत दिली आणि त्याची निवड झाली. एकदम पुस्तकी शिक्षणातून प्रात्यशिक्षकावर आधारित शिक्षणप्रणालीवर भर असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी तो शिक्षक म्हणून गेल्यामुळे त्याला अनेक अडचणी आल्या. मात्र अल्पावधीतच त्याने चुणूक दाखवली आणि आंतराष्ट्रीय बोर्डाच्या शाळेत त्याची जीवशास्त्राचा शिक्षक म्हणून निवड झाली.
जीवनात वेगवेगळे प्रयोग करणारा अवलिया
आयुष्यात वेगळे करण्याच्या स्वभावामुळेच त्याने हे यश मिळवल्याचे त्याचे मित्र नातेवाईक सांगतात. पत्नी मीनाक्षीही या प्रयोगात त्याला साथ देत असते. काही महिन्यांपूर्वी या दोघांनी जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या गुहेत तीन दिवस घालवले. व्हिएतनाम येथे हँग हेन असे या गुहेचे नाव आहे. ४३५ फूट उंच, ४९५ फूट रुंद आणि दीड किलाेमीटर लांब ही गुहा आहे.
विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व घडवण्यावर भर
सहा वर्षांत संदीपने मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनामध्ये शिक्षक म्हणून काम केले. तेथे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो. हसत खेळत शिक्षणासह संकल्पना स्पष्ट करण्याकडे अधिक लक्ष देतात. तेथे ग्रेड सिस्टिम असल्यामुळे विद्यार्थी परीक्षार्थी होत नाही, असे संदीपचे म्हणणे आहे. तेथे शिक्षकाला समाजात मोठे स्थान आहे. लाखो रुपयांत पगार आहे. शिवाय अधिकारी दर्जाच्या सुविधा दिल्या जातात.