आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तालुकास्तरीय बदल्यांत नऊ शिक्षकांनी केला गैरप्रकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तालुकास्तरावरील बदल्यांदरम्यान रात्रीतून शिक्षक संघटनांचे पदाधिकारी बनलेल्या शिक्षकांची चौकशी करून तसा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे देण्यात आला आहे. यात नऊ शिक्षकांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. दोषी शिक्षक व संबंधित अधिकार्‍यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार असून ही बदली प्रक्रियाच रद्द करण्याचे संकेत मिळाले आहेत.

मेमध्ये तालुकास्तरावरील 245 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. शासनाने एप्रिल महिन्यात परिपत्रक काढून मान्यता प्राप्त शिक्षक संघटनेच्या चार पदाधिकार्‍यांना पाच वर्षे बदली प्रक्रियेतून सूट देण्याचे आदेश दिले होते. त्यात जिल्हाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सरचिटणीस आणि कार्याध्यक्षांचा समावेश होता. या परिपत्रकाचा लाभ घेण्यासाठी शिक्षक संघटनांनी रात्रीतून संघटनेचे पदाधिकारी बदलले. त्यामुळे खुलताबाद, कन्नड, सिल्लोड आणि फुलंब्री तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी व गट विकास अधिकार्‍यांनी संघटनेच्या 19 पदाधिकार्‍यांना बदलीतून सूट दिली. याबाबत काही संघटनांनी आवाज उठवल्याने औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, सोयगाव आणि पैठण तालुक्यात होणार्‍या बदल्यांत प्रशासनाने पदाधिकार्‍यांना सूट नाकारून त्यांची बदली केली होती. याप्रकरणी तीन तालुक्यांतील बदल्यांची चौकशी बाकी होती. ही चौकशी करून अहवाल सीईओ बनकर यांच्याकडे पाठवण्यात आला असून यात नऊ शिक्षकांसह गट शिक्षणाधिकारी व गट विकास अधिकारी दोषी आढळून आले आहेत.

कन्नड- शिक्षक सेना-1 मनसे-1
खुलताबाद-शिक्षक संघ-दोन, शिक्षक सेना-दोन, राष्ट्रवादी शिक्षक संघटना-दोन, शिक्षक संघटना-दोन, मुफ्टा-एक सिल्लोड-शिक्षक परिषद, शिक्षक संघ, शिक्षक संघटना प्रत्येकी एक, शिक्षक समिती- दोन फुलंब्री-शिक्षक संघ, शिक्षक समिती व कास्ट्राईब

अधिकार्‍यांवर कारवाईची शक्यता
दोषीं शिक्षकांसह गट शिक्षण व गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई होऊ शकते. ज्या संघटनांनी हा गैरप्रकार केला त्यांच्यावरही बंदी आणली जाऊ शकते.

खुलताबाद आघाडीवर
शिक्षक संघटनांनी खुलताबादमध्ये सर्वाधिक गैरव्यवहार केला आहे. शिक्षक संघटनांसह शिक्षक व अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. शैलेश क्षीरसागर, सदस्य जि. प.

बदल्या रद्द कराव्यात
ज्ञानदानाचे पवित्र काम करणार्‍या शिक्षकांनी असा गैरप्रकार करणे चुकीचे आहे. झालेल्या बदल्या रद्द केल्या पाहिजे. संतोष जाधव, जि. प.सदस्य

तीन दिवसांत कारवाई
दोषींची माहिती सीईओ बनकर यांच्याकडे सोपवली आहे. तीन दिवसांत दोषींवर कारवाई केली जाईल. नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी