आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोफत गणवेश’ दूरच, शिक्षक उकळताहेत पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागासप्रवर्ग दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना मनपाच्या वतीने गणवेशासाठी प्रत्येकी ४०० रुपये देण्यात येतात. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करायची आहे, परंतु सिडको एन-७ येथील शाळेत गणवेश मिळणे तर दूरच, उलट येथील शिक्षक विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ४०० रुपये उकळत असल्याची तक्रार एमआयएम सदस्या संगीता वाघुले यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. हा प्रकार गंभीर असून उपायुक्त रवींद्र निकम यांनी चौकशी करून तातडीने अहवाल सादर करावा, असे आदेश सभापती गजानन बारवाल यांनी दिले आहेत. 
 
विद्यार्थ्यांना जूनमध्येच गणवेश देण्याचे शासनाचे आदेश आहेत. ते शक्य होत नसल्याने पालकांनी गणवेश खरेदी करावा आणि मनपाने संबंधित पालकाच्या खात्यात ४०० रुपये जमा करावेत, असे ठरले आहे. आता सप्टेंबर महिना अर्धा संपला तरी विद्यार्थ्यांना पैशाचे वाटप करण्यात आले नाही. ४०० रुपयांत दोन गणवेश खरेदी करणे शक्य नाही, याची कल्पना पालकांप्रमाणेच शिक्षकांनाही आहे. तरीही शासनाकडून मिळताहेत तर पैसे घेऊन टाका, म्हणून पालक पैसे घेण्यास राजी झाले आहेत, परंतु शुल्क शिलकीवरील खाते उघडण्यास बँका तयार नाहीत. प्रशासनाने काही बँकांशी बोलणी करून तसे प्रयत्न केले. या प्रयत्नांना काही ठिकाणी यश आले अाहे. 
 
... तरी चौकशी करा 
सिडकोएन-७ येथील शाळेत शिक्षकांनी खात्यात पैसे जमा करण्यापूर्वीच विद्यार्थ्यांकडून ४०० रुपये वसूल करणे सुरू केले आहे. वाघुले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. काही पालकांनी त्यांना घरी जाऊन हा प्रकार त्यांच्या कानी घातला. शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी असे घडत नसल्याचे सांगितले असले तरी एका पालकाने तक्रार केली असेल तर याची चौकशी व्हायलाच हवी, असे बारवाल यांनी स्पष्ट केले. उपायुक्त निकम यांनी याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
बातम्या आणखी आहेत...