आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बत्तीस वर्षांपासून भावले मास्तरांनी तेवत ठेवला ज्ञानदानाचा यज्ञ.!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एकविसाव्या शतकात अनेकांना ऐषारामात जीवन जगण्याचा मोह आवरता आला नाही. याला शिक्षकही अपवाद नाहीत. त्यांनी मोठमोठे बंगले, कार आणि महागड्या दुचाकी घेतल्या आहेत. मात्र, भिवधानोरा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कोंडिराम भागुजी भावले हे कोणत्याही मोहाला बळी पडले नाहीत.

सायकल किंवा पायी जाऊनच त्यांनी ज्ञानदानाचा यज्ञ तेवत ठेवला आहे. आदर्श समाज घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या या शिक्षकाने 32 वर्षांच्या कार्यकाळात केवळ तीनदा जिल्हा परिषदेचे मुख्यालय पाहिले आहे.

ज्या गावात भावले यांची नियुक्ती असायची तेथील 10 वी आणि 12 वीच्या मुलांना ते मोफत शिक्षण द्यायचे. त्यांचा आणखी एक आदर्श म्हणजे जेथे त्यांची नियुक्ती असायची तेथे ते परिवारासह राहत. त्यामुळे शाळेला दांडी मारण्याची त्यांच्यावर वेळ आली नाही. पायी अथवा सायकलवर येणे-जाणे करत असल्याने ते निरोगी राहिले. परिणामी त्यांच्या ज्ञानदानात कोणताही अडथळ आला नाही.

भावले यांना 1998 मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. दोनदा विनाखर्च, कोणालाही न सांगता वेतनवाढ मिळाली. 1981 मध्ये त्यांना ज्ञानेश्वरवाडी येथील शाळेत नियुक्ती मिळाली होती.

किरकोळ रजाही घेतली नाही
मी गेल्या वीस वर्षांपासून त्यांना ओळखतो. पाच वर्षे त्यांच्यासोबत भिंदोन तांडा येथे कामही केले आहे. त्यांनी या कालावधीत साधी किरकोळ रजाही घेतली नाही. कैलास गायकवाड, शिक्षक, भिंदोन तांडा

समाजाभिमुख काम करत जाणे
मला शरीर जपायचे असून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करायचा आहे. मला सायकलची आवड असल्याने दुचाकी घेण्याचा विषय मनाला शिवलाही नाही. समाजाभिमुख काम करत जाणे हाच शिक्षकांचा व्यासंग असावा. कोंडिराम भागुजी भावले, शिक्षक भिवधानोरा

विद्यार्र्थी नवोदय, सेल्सटॅक्समध्ये
भावले यांनी ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले त्यातील बहुतेक विद्यार्थी नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. निलजगाव येथील उज्ज्वला नामदेव पालवे या त्यांच्या विद्यार्थिनी विक्रीकर कार्यालयात अधिकारी आहेत. अगणित विद्यार्थी उच्च् पदावर असल्याने त्यांनी सर्वांची नावे सांगणे टाळले.