आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदरमोड करून शिक्षकाने शाळेत फुलवले नंदनवन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - केवळ नोकरी म्हणून विद्यार्थ्यांना पुस्तकी धडे देण्याऐवजी त्यांच्यात सामाजिक आणि पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण करण्यासाठी ज्ञानेश्वरवाडीतील (ता. पैठण) शिक्षक शशिकांत बाळकृष्ण ठोंबरे यांनी पाच वर्षांत एक लाखाची पदरमोड करून शाळा परिसरात नंदनवन फुलवले आहे. विशेष म्हणजे बागेतील फळ, भाजीपाल्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी केला जातो.

मागील पाच वर्षांच्या अथक पर्शिमातून 28 वर्षीय जिल्हा परिषद शिक्षकाने हा बदल घडवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन जि.प.च्या शिक्षण विभागाने त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन जवळपासच्या शाळेतही असा प्रयोग राबवला जाणार आहे. त्यासाठी ते स्वत: मदत करणार आहेत. वैजापूरमधील डीटीएड महाविद्यालयात शिक्षण घेताना युवा केंद्रातून वृक्ष लागवड करण्याचा ठोंबरे यांनी ध्यास घेतला होता.

तसेच ज्या शाळेत रुजू होणार त्या शाळेत विद्यार्थी व गावकर्‍यांच्या सहकार्याने शाळेत बाग फुलवण्याचा त्यांचा संकल्प होता. त्याप्रमाणे त्यांनी पाच वष्रे कोणाकडूनही मदतीची अपेक्षा न करता लोकसहभागातून तसेच पगारातून एक लाख रुपये जमा करून शाळा परिसरात फळ, भाजीपाल्याची लागवड केली आहे. ठोंबरे हे मूळ आष्टी तालुक्यातील देऊळगावमधील आहेत. 2003 मध्ये त्यांनी बारावी विज्ञानमध्ये 77 टक्के गुण मिळवले. वैद्यकीय शिक्षण घेण्याऐवजी वडिलांच्या आग्रहाखातर डीटीएडला प्रवेश घेऊन 2006 मध्ये शिक्षण पूर्ण केले. त्याच वर्षी त्यांना ज्ञानेश्वरवाडी केंद्र आपेगाव येथील पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळेवर नियुक्ती मिळाली. या शाळेत 44 विद्यार्थी व 39 विद्यार्थिनी आहेत.

वर्षभरातून एकही सुटी नाही : जिल्हा परिषदेतील शिक्षक सुट्या घेण्याबाबत कुचराई करत नाहीत. मात्र, शशिकांत यांनी एकही दिवस सुटी न घेता शाळा परिसरात बाल उद्यानाची उभारणी केली. उन्हाळी आणि दिवाळी सुटीच्या काळात त्यांनी संरक्षक भिंतीला रंगवणे, भिंतीवर इंग्रजीचे शब्दार्थ, म्हणी, सुविचार लिहिणे, चित्रे काढणे असे काम केले. तसेच या काळात त्यांनी 12 आंब्याचे, पेरू, जांभुळ, निंबोणी, चिकूचे प्रत्येकी दोन, तर मोसंबीचे 10 व आवळ्याचे सहा वृक्ष लावले. यासाठी एकूण दोन लाख 10 हजार 840 रुपयांचा खर्च आला असून ठोंबरे व इतर शिक्षकांनी त्यात एक लाखाची भर घातली.

गावकर्‍यांचा महत्त्वाचा वाटा
शासनाच्या प्रत्येक योजना प्रामाणिक राबवल्या. शाळेतील शिक्षक आणि गावकर्‍यांचा महत्त्वाचा वाटा असल्याने हा बदल शक्य झाला आहे. शशिकांत ठोंबरे, शिक्षक, जि.प. शाळा.