आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी झाले शिक्षक, कुणी शिपाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस बुधवारी (5 सप्टेंबर) सर्वत्र शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील सर्वच शाळेत वातावरण वेगळे दिसले. रोज शाळेच्या गणवेशात येणारे विद्यार्थी शिक्षकांच्या वेशात आले. मुली आपल्या आवडत्या शिक्षिकेप्रमाणे त्यांच्यासारख्याच तयार होऊन आल्या. शाळेत साफसफाई करणार्‍या मावशीबाई, शिपाई मामांप्रमाणे विद्यार्थ्यांनीच शाळेत सफाई केली. आणि शिकवण्याचा अनुभव देखील घेतला.

विद्यार्थ्यांनी शिक्षकदिन शिक्षकांप्रती आदर व्यक्त करत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. विद्यार्थ्यांनीच मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई आणि शाळेतील मावशीबाई, शिपाई मामा अशा भूमिका पार पाडल्या. धोतर, नऊवारी पातळ, साडी, गांधी टोपी यांसह काही विद्यार्थी स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वेशभूषेत दिसून आले, तर काही विद्यार्थ्यांनी आवडत्या शिक्षकांप्रमाणे शिकवण्याचा प्रयत्न केला.

या सर्व विद्यार्थ्यांनी शाळा भरण्यापासून ते शाळा सुटेपर्यंतचे व्यवस्थापन सांभाळले. तसेच कर्मचार्‍यांच्या नकलाही केल्या. शिक्षक म्हणून एक दिवस मिळालेला अनुभव हा शिक्षकांच्या जबाबदारीची जाणीव करणारा तसेच त्यांचे काम किती महत्त्वपूर्ण आहे हे शिकवणारा होता, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिल्या.

वर्गमैत्रिणीला शिकवताना पाहून खूप आनंद झाला
रोज आपल्या बाई आपल्याला शिकवतात. ते कधी-कधी कंटाळवाणेही वाटते. मात्र आज माझी वर्गमैत्रीणच शिक्षिका होऊन जेव्हा शिकवायला आली तेव्हा खूप आनंदही झाला. शिक्षक होणे सोपे आहे, परंतु ती जबाबदारी पेलणे तितकेच अवघड आहे.’’ गायत्री काकडे, विद्यार्थिनी, शारदा मंदिर

कामाची जाणीव झाली
शाळेची पर्यवेक्षिका व्हायचे म्हणून मी कालपासूनच उत्साहात होते. सर्वांनीच माझे नियोजन शांतपणे ऐकून घेतले. त्यामुळे मला खूप छान वाटले. शिक्षकांबरोबरच पर्यवेक्षिकेचे काम किती मोठे आहे याची जाणीव झाली.’’ अवंतिका गोसावी, विद्यार्थिनी, शारदा मंदिर

वेगळा अनुभव मिळाला
विद्यार्थी असण्याचा अनुभव तर नेहमीच असतो मात्र, शिक्षक झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत त्यांना शिकवण्याचा वेगळा अनुभव मिळाला.’’ हरेश तन्वीर, विद्यार्थी, पायोनिअर्स

घंटा वाजवण्याची मज्जा आली
आज मी शाळेचा शिपाई झालो होतो. रोज शाळा भरण्यापूर्वीची साफसफाई, सर्व वर्गात खडू ठेवणे, फाइलची ने-आण करणे अशी कामे केली. या निमित्ताने बाळामामा किती काम करतात हा अनुभव आला, तर शाळा सुटताना आणि भरताना घंटा वाजवण्याची मज्जा आली.’’ रोहन ढेरे, विद्यार्थी, शिशुविकास

शिक्षिका होणे सोपे नाही अवघड काम
मी प्रयोगशाळेत सहायक शिक्षिका झाले होते. सुरुवातीला थोडी भीती वाटली. एक विद्यार्थी म्हणून रोज किती गोंधळ करतो, परंतु आज स्वत: शिक्षक होऊन शिकवताना हे काम सोपे नाही याचा अनुभव आला. वर्गात मुलांवर नियंत्रण ठेवणे हे खरंच अवघड काम आहे.’’ र्शद्धा जाधव, विद्यार्थिनी, शारदा मंदिर