औरंगाबाद-शहरातील १६ विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनी अनोखे चित्रप्रदर्शन मांडले होते. ५० चित्रांचे हे देखणे प्रदर्शन मुलांच्या आफाट प्रतिभांचे दर्शन घडवणारे आहे. मिरर आर्ट गॅलरीमध्ये श्रुती दहिहंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चितारलेल्या कलाकृती साकारल्या आहेत.
आयएनआयएफडीचे संचालक समीर दुग्गल आणि शासकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक रमेश बाविस्कर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. निसर्ग, मॉडर्न आर्ट, देवतांची विविध रूपे यांची मांदियाळीच मुलांनी उभी केली. ऑइल, पोस्टर कलर, अॅक्रॅिलक कलर आणि कॅन्व्हास अशा विविध प्रकारच्या रंगांचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे वैविध्य त्यांच्या मांडणीपासून दिसून येते. मुलांचे भावविश्व आणि कल्पनाविश्व अफाट असते. चित्रांतील रंगसंगती, कल्पनांचे पंख असलेली ही चित्रे पाहणाऱ्यांसोबत लगेचच संवाद साधू शकतात. ६ व ७ सप्टेंबरला हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यास रसिकांचा प्रतिसाद मिळाला.
गणेश : गणेशाच्या विविधांगी प्रतिभेचे दर्शन या चित्रांतून घडते. गणेशरूपांना प्रत्येक कलावंत वेगळ्या शैलीने मांडतो. मुलांनी या प्रदर्शनात चितारलेले गणेश अतिशय आकर्षक आहेत. यामध्ये काळ्या रंगाचा वापर करून मीनाक्षी मिश्रा हिने काढलेले गणेशाचे लोभस रूप भक्तिभाव फुलवणारे आहे.
मॉडर्न आर्ट : बाजारपेठेतील मनोहारी रंग मांडणारे मॉडर्न आर्टचे चित्र स्नेहल मुळे हिने काढले आहे. रंगाचा सुरेख वापर करत तिने या चित्रात जिवंतपणा आणला आहे. बाजारपेठेत वावरणारे विविध चेहरे कसे एक होऊन जातात हे या चित्रातून सूचित केले आहे.
नृत्य : रेणुका खरात हिने काढलेल्या नृत्य करणाऱ्या दोन मुलींचे चित्र तरलता दाखवणारे आहे. यामध्ये लाल, पिवळा आणि निळ्या रंगाचा सुरेख संगम तिने साधला आहे. नृत्यांगनेच्या अंगात असलेली लचक या चित्रातून प्रकट होते.