आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पात्रतेच्या सक्तीने गुरुजी बेजार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शिक्षण हक्क कायद्यानुसार सहावी ते आठवीच्या शिक्षकांना बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी. म्हणजेच पदवी शिक्षणाची किमान पात्रता बंधनकारक करण्यात आली आहे. ही पात्रता पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना 2015 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, मुदतीपेक्षा पदवी प्राप्त करण्यासाठी लागणारा कालावधी जास्त असल्यामुळे सर्व शिक्षक त्रस्त झाले आहेत.

पूर्वी डी. एड. अभ्यासक्रमाला दहावी, तर बी. एड. अभ्यासक्रमाला 12 वीनंतर प्रवेश घेता येत होता. मात्र, त्यात बदल होऊन सध्या डी.एड.ला 12 वीनंतर, तर बी. एड. ला पदवीनंतर प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, हा नियम लागू होण्यासाठी डी.एड. आणि बी.एड. झालेल्या शिक्षकांनी पुढे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले नाही. मात्र, बदलता काळ, वाढती स्पर्धा आणि अभ्यासक्रमात होणारे सततचे बदल लक्षात घेता, विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रधान शिक्षण देण्यासाठी प्रथम शिक्षकाने गुणवत्ता आत्मसात करायला हवी. त्याबरोबरच बदललेल्या अभ्यासक्रमाचे सवरेत्तम ज्ञान शिक्षकाला असेल तरच तो विद्यार्थ्यांनादेखील चांगले शिक्षण देऊ शकेल. याच हेतूने 2009 मध्ये करण्यात आलेल्या सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यात शिक्षकांनी पदवी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पदवी मिळवण्यासाठी 2015 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामुळे आता इतक्या वर्षांनंतर शिक्षण घ्यावे लागणार असल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत, तर सेवानिवृत्तीचा काळ जवळ येत असताना पदवी आवश्यक झाल्याने काही वरिष्ठ शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नियमात शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक करीत आहेत.

राज्यात सव्वा लाख शिक्षकांकडे बी.ए., बी.कॉम. किंवा बी.एस्सी.ची पदवी नाही, तर औरंगाबाद शहरात पाच ते साडेपाच हजार शिक्षक आहेत. त्यापैकी जवळपास चार ते चाडेचार हजार शिक्षक पदवीप्राप्त नाहीत. त्यात आता या नियमानुसार अडीच वर्षांत पदवी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शिक्षक भरती संस्थेची मध्यस्थी : शिक्षकांची वेळेची अडचण लक्षात घेता, मुंबईच्या शिक्षक भरती संस्थेने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कृष्णकुमार यांच्याशी चर्चा केली आहे. चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांना पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुक्त विद्यापीठाने प्रवेशाची मुदत वाढवून दिली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत शिक्षक प्रवेश घेऊ शकतील. त्यामुळे 2015 पर्यंत त्यांची पदवी पूर्ण होईल.