आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरवंडी तांड्यावर शिक्षकांच्या ध्यासातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे स्वप्न सत्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वह्या-पुस्तकाविना हसत-खेळत आकडेमोड करणारे विद्यार्थी, प्रत्येक वर्गात लर्निंगच्या माध्यमातून चालणारा अभ्यास, सौरऊर्जेमुळे स्वयंप्रकाशित झालेली शाळा अन् १०० टक्के उपस्थिती, हे चित्र आहे वरवंडी तांड्यावरील जिल्हा परिषद शाळेचे. साधारणत: दोन वर्षांपूर्वी ओस पडलेल्या शाळेत आता १७२ विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू आहे.

औरंगाबाद शहरापासून ३० किलोमीटरवर डोंगरांच्या कुशीत वसलेल्या वरवंडी तांड्यावर पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. तांड्यावरील जवळपास सर्वच जण ऊसतोड कामगार आहेत. तोडीचा हंगाम सुरू झाला की साखर कारखान्यांच्या परिसरात स्थलांतरित होणाऱ्या या कामगारांपाठोपाठ त्यांची मुलंही गाव सोडतात. त्यामुळे शाळा ओस पडते; मात्र शिक्षकांनी ही गळती थांबवण्याचा संकल्प केला.

या संकल्पाला मूर्तरूप देण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी कष्टाची कमाई देऊ केली. त्यात शिक्षकांनीही भर टाकली अन् या पैशातून शाळेची रंगरंगोटी, विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधाही सुरू केल्या. आता सर्व १७२ विद्यार्थी दररोज उपस्थित राहतात. ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षणामुळे मुलांमध्ये शाळा आणि अभ्यासाविषयीची गोडी निर्माण झाली आहे. या शाळेतील पाच शिक्षकांच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती तर वाढलीच शिवाय नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढला. स्वप्नवत वाटावा एवढा बदल करून दाखवणाऱ्या या शिक्षकांनी सर्व शाळा आणि इतर शिक्षकांसमोर आदर्श ठेवला आहे.
एकत्रित प्रयत्नांतून एकेकाळीओस पडलेल्या या शाळेत १७२ विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू आहे. पाडळी तांडा, रामनगर, फतेवाडी, वरवंडी गावातील विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी शाळेत रमावे, या भावनेने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मोहिमेला शिक्षक, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून यशही मिळत आहे. भरत काळे, शिक्षक,वरवंडी तांडा