आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव, 400 झाडे उखडून फेकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाडसावंगी- लाडसावंगी, सेलूद , चारठा, हातमाळी, लामकाना, पिंपळखुटा, औरंगपूर, कासनापूर, सय्यदपूर ही गावे   औरंगाबाद तालुक्यातील डाळिंबाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, परंतु डाळिंबाच्या झाडांना फळे मोठ्या संख्येने लगडलेली असताना त्या फळांवर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. यामुळे तोंडी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी हतबल झाले.

तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाची फळे काळी पडतात व कच्चे असतानाच झाडावर फुटतात. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढून दुसऱ्या फळावर याचा परिणाम होतो. शेलूद येथील शेतकरी लक्ष्मण कुंडलिक बोचरे यांनी तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंब फळासह लगडलेली ४०० झाडे ट्रॅक्टरच्या साहाय्याने उखडून दुधना नदीच्या किनारी गंजी  घातली. डोळ्यासमोर डाळिंबांनी लगडलेली ४०० झाडांची बाग कठोर हृदय करून तेल्या रोगामुळे  उखडून फेकावी लागली. यामुळे बोचरे यांनी केलेली मेहनत, केलेला दोन लाखांच्या खर्चासह लाखो रुपयांचे नुकसान झाले असून हाती काहीच आले नसल्याने बोचरे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. लक्ष्मण बोचरे यांनी  उखडून टाकलेली डाळिंबाची झाडे नदीचे पाणी शेतात घुसू नये म्हणून नदी काठी दाबलीत. 

किसन बोचरे म्हणाले, डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मला फळे तोडून फेकण्यासाठी मजुरांना मजुरी द्यावी लागली असती. अगोदरच शेतीसाठी केलेला खर्चही निघाला नाही आणि आता मुलीच्या लग्नाला पैसा कुठून आणावा ही चिंता सतावत आहे. अशीच परिस्थिती ऋषी नरवडे, रामनाथ बोचरे, बंडू नरवडे, दगडू नरवडे, दादाराव चौधरी यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची आहे.
बातम्या आणखी आहेत...