आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेंभापुरी प्रकल्पातून 5६ हजार ब्रास गाळाचा उपसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- टेंभापुरी मध्यम प्रकल्पातून मागील दोन महिन्यांपासून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. परिसरातील शेतक-यांनी शेतीत टाकण्यासाठी जवळपास 5६ हजार ब्रास गाळाचा उपसा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात यंदा चांगलीच वाढ होणार असून सिंचन व पिण्यासाठी या पाण्याचा वापर होणार आहे.
टेंभापुरी मध्यम प्रकल्पांतर्गत वाळूज परिसरातील सुमारे ७50 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन 1978 मध्ये करण्यात आले. प्रकल्पामुळे लिंबेजळगाव, शिवराई ही गावे प्रभावित झाली. लिंबेजळगावचे स्थलांतरण करण्यात आले. मात्र, शिवराईचे स्थलांतरण अनेक वर्ष रखडले गेले. परिणामी प्रकल्प पूर्ण झालेला असताना केवळ सांडव्याचे काम अपुरे ठेवण्यात आले होते. त्यानंतरच्या तब्बल 22 वर्षानंतर शिवराई गावाचे वाळूजलगतच्या शासकीय गायरान जमिनीवर स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर सांडव्याचे कामही सिंचन विभागाने तातडीने पूर्ण केले. मात्र, परिसरातील पावसाचे प्रमाण कमी असल्याने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाही. यंदाच्या दुष्काळाने तर वाळूज भागातील सर्वच प्रकल्प कोरडे पडल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परिणामी शासनाने लोकसहभागातून प्रकल्पातील गाळ काढून तो शेतकºयांनी आपल्या शेतात टाकावा असे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत वाळूज भागातील लिंबेजळगाव, टेंभापुरी, लांझी, नारायणपूर, शिवराई, तुर्काबाद खराडी, दहेगाव बंगला, नायगाव भागातील शेतक-यांनी मिळेल ती वाहने आणून प्रकल्पातील गाळाचा उपसा सुरू केला आहे. डंपर, टेंपो, ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून नेण्यात येत आहे.

सध्याही गाळाचा उपसा सुरूच असून आतापर्यंत सुमारे 5६ हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे. तलावात सध्या पाणी नसल्याने गाळ वाहून नेण्यासाठी वाहने सरळ प्रकल्पात नेता येणे शक्य झाले आहे.