आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐन श्रावण महिन्यात दहा हजार ग्राहक ‘गॅस’वर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ऐन श्रावण महिन्यात गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना कसरत करावी लागत आहे. गेल्या आठवड्यात चार हजारांची प्रतीक्षा यादी आता दहा हजारांवर गेली असून इंडेनचे दोन व हिंदुस्तान पेट्रोलियमचे आठ हजार ग्राहक सिलिंडरच्या प्रतीक्षेत आहेत.

हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या प्रकल्पात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सिलिंडरचा पुरवठा करण्यात अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे चार दिवसांत प्रतीक्षा यादी वाढली आहे. ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी आठ दिवसांत कंपनीच्या वतीने रविवारीही प्रकल्प सुरू ठेवण्यात येणार आहे.

श्रावण महिन्यात बहुतांशी सण येत असल्याने सिलिंडरच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे दोन ते तीन दिवसांची वेटिंग असते, परंतु सध्या ही वेटिंग वाढली आहे. मागच्या आठवड्यात इंडेन कंपनीचे सिलिंडर चार दिवस मनमाड येथील प्रकल्पाला पुरवण्यात आले. त्यामुळे शहरात दरदिवशी दीड हजार सिलिंडरपैकी केवळ सहाशे ते आठशे सिलिंडर येत होते. परिणामी प्रतीक्षा यादी चार हजारांवर गेली होती. त्यात तीन दिवसांपासून हिंदुस्तान पेट्रोलियमच्या प्रकल्पात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने दररोज किमान दीड ते दोन हजार सिलिंडर कमी येत आहेत. भारत गॅसच्या एकाही ग्राहकाला अडचण आली नसून एक दिवसाचीही प्रतीक्षा यादी नसल्याचे समोर आले आहे.


वेटिंग संख्या 2200 वर
तीन दिवसांपूर्वी एजन्सीवर तीन हजार ग्राहकांची वेटिंग होती, कंपनीने अधिकचे सिलिंडर दिल्याने वेटिंग 2200 वर आली आहे. या आठवड्यात प्रतीक्षा यादी संपेल. नारायण खडके, संचालक, इंडेन, गॅस एजन्सी.


आमचा एकही ग्राहक वेटिंगवर नाही
भारत गॅसच्या ग्राहकांना सिलिंडर पोहोचवण्यात कोणतीच अडचण नसल्याने शहरातील एकही ग्राहक वेटिंगवर नाही. गोविंद आचरेकर, विभागीय अधिकारी, भारत गॅस.


वेटिंग संपेल
प्रकल्पामध्ये दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहरात होणारा सिलिंडरचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे वेटिंग वाढली आहे. एक आठवड्यात वेटिंग संपून जाईल. वेटिंग कमी करण्यासाठी रविवारीही प्रकल्प सुरू ठेवू. आदित्य गुप्ता, विभागीय विक्री अधिकारी, हिंदुस्तान पेट्रोलियम.