आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हैसमाळ, गौताळ्याला तंबूत मुक्कामाची सोय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी म्हैसमाळचे डोंगर आणि गौताळा अभयारण्यात तंबूत मुक्काम करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. वन विभागाच्या मदतीने येत्या महिना- दीड महिन्यातच हा उपक्रम सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले.

कोठे तंबू टाकता येतील, तेथे पाण्याची सोय कशी करता येईल, याचे सर्वेक्षण वन विभागाच्या वतीने करण्यात आले असून लवकरच या योजनेला मूर्त स्वरूप दिले जाणार आहे. यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

म्हैसमाळ तसेच गौताळा ही चांगली पर्यटन स्थळे आहेत. तेथे थांबण्याची अनेक पर्यटकांची इच्छा असते. मात्र, वन विभाग कोणत्याही प्रकारच्या बांधकामांना परवानगी देत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी गेस्ट हाऊस बांधता येत नाही. म्हणून तंबू उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय होईल फायदा?
पर्यटकांना चांगले स्थळ उपलब्ध होईल.
देशी-विदेशी पर्यटक म्हैसमाळ, गौताळ्याला प्राधान्य देतील.
स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.

साहसी खेळ एकत्र आणणार
शहरालगत पॅराग्लायडिंगसारखे साहसी खेळ खेळले जातात. मात्र, सध्या ते खासगी तत्त्वावर आहेत. यासह अन्य खेळांना एकत्र करून ते पर्यटनस्थळी उपलब्ध करून दिल्यास साहसी पर्यटक आकर्षित होतील. त्यामुळे येत्या काही दिवसांत साहसी खेळ एका ठिकाणी आणण्याचा मानस विक्रमकुमार यांनी व्यक्त केला.

लवकरच शुभारंभ
जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे. पर्यटकांना म्हैसमाळचे डोंगर, गौताळा अभयारण्याकडे आकर्षित करण्यासाठी तंबू उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. येत्या काही दिवसांत त्याचा शुभारंभ होईल विक्रमकुमार, जिल्हाधिकारी.

काय असेल या प्रकल्पात?
साधारण 10 बाय 15 आकाराचे तंबू उभारण्यात येतील. तेथे पाण्याची व्यवस्था तसेच अटॅच्ड संडास, बाथरूम असेल. कूलर किंवा एसीही लावण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तंबू उभारणीसाठी खर्च कमी येणार असल्याने येथील वास्तव्यासाठी पर्यटकांना कमीच पैसे मोजावे लागतील. बाजूलाच जेवणाचीही व्यवस्था केली जाईल.

बांबूच्या झोपड्यांचाही विचार
कृत्रिम तंबू उभारण्याबरोबरच अन्य काही ठिकाणी बांबूच्या झोपड्या उभारता येतील का, याचीही चाचपणी सुरू आहे. तसे झाल्यास तंबूपेक्षांही बांबूच्या झोपड्यांत राहणार्‍यांची संख्या वाढू शकते, असा कयास आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात बांबूचे लागवड क्षेत्र वाढवण्याचाही विचार सुरू आहे.