आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी सुरू, सात सराव परीक्षा होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिका शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी वर्गात आजपासून दर आठवड्याच्या विशेष परीक्षांना प्रारंभ झाला आहे. दहावीच्या या विद्यार्थ्यांवर मनपा विशेष मेहनत घेत असून या वर्षभरात सात ते आठ सराव परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

महापालिकेच्या मराठी उर्दूच्या १२ शाळांत नववीतून दहावीला गेलेले ५९१ विद्यार्थी आहेत. दहावीचा निकाल चांगला लागावा यासाठी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शिक्षण विभागाला सूचना दिल्यानंतर यंदा प्रथमच उन्हाळी वर्ग या १२ शाळांत सुरू झाले. इंग्रजी, गणित विज्ञान हे विषय शिकवले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊन त्यांच्या मनातील बोर्डाच्या परीक्षेची भीती नाहीशी व्हावी त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात आयुक्त बकोरियांनी या विद्यार्थांच्या कमी गुणाच्या वस्तुनिष्ठ प्रकारच्या परीक्षा घ्याव्यात असे सुचवले होते. त्यानुसार आठवडाभरात झालेल्या अभ्यासक्रमाची एक परीक्षा दर आठवड्याला घेण्यात येणार आहे. आज ही पहिली परीक्षा झाली. आज गणिताचा पेपर होता. २० मिनिटांचा २० गुणांचा दहा प्रश्नांचा हा पेपर होता. बहुपर्यायी प्रकारची ही प्रश्नपत्रिका होती. दुपारी दोन वाजता त्याचे निकालही जाहीर करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी त्यात पैकीच्या पैकी गुण घेतल्याचे उपायुक्त रवींद्र निकम यांनी सांगितले.

सरावासाठी बोर्डाच्या परीक्षेसारखीच प्रश्नपत्रिका
यापरीक्षांच्या माध्यमातून कच्चे विद्यार्थी लक्षात येणार असून त्यांच्यावर वर्षभरात विशेष मेहनत घेतली जाणार आहे. दहावीचा अभ्यासक्रम लवकर संपवून त्यांच्या किमान सात ते आठ सराव परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या सराव परीक्षा अगदी बोर्डाच्या परीक्षेसारख्याच राहणार आहेत. निकम म्हणाले की, आज ४५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एखादा विद्यार्थी आला नाही तर फोन करून विचारणा केली जाते अथवा घरी जाऊन सांगितले जाते. याशिवाय हे वर्ग व्यवस्थित सुरू आहेत की नाही यासाठी शिक्षण विभागाचे कर्मचारीही या शाळांना भेट देत असतात.
बातम्या आणखी आहेत...