आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Term Development To The Application For Hajj Pilgrimage

हज यात्रेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, हज कमिटी ऑफ इंडियाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हजयात्रेसाठी अर्ज करण्यास १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज भरण्याची तारीख फेब्रुवारी रोजी संपणार होती. आतापर्यंत ४००९ भाविकांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती हज कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आली. ज्या भाविकांना अर्ज करायचे असतील त्यांनी तातडीने ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन खिदमत-ए-हुज्जाज कमिटीचे हाजी करिमोद्दीन पटेल यांनी केले आहे.
गेल्या वर्षी मराठवाड्यातून २१३२ भाविक हज यात्रेसाठी गेले होते. देशभरातून लाख ७० हजार कोटा होता. त्यापैकी लाख २५ हजारचा कोटा हज कमिटीचा होता. ४५ हजारचा कोटा हा खासगी टूर कंपन्यांना देण्यात आला होता. यंदाचा हजचा कोटा निश्चित झाला नाही. जे अर्जदार तीन वर्षांपासून अर्ज करत आहेत, मात्र त्यांचा नंबर लागत नव्हता अशा भाविकांना सर्वप्रथम संधी देण्यात येणार आहे. अर्ज करताना तीन वर्षांत जे अर्ज केले त्या अर्जांचा कव्हर नंबर अर्जामध्ये भरावयाचा आहे. तसेच ज्यांना १३ जानेवारी २०१६ रोजी वयाची ७० वर्षे पूर्ण होतील, त्या भाविकांची हज यात्रेसाठी थेट निवड होणार आहे. त्यांच्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला हज यात्रेला जाण्यासाठी परवानगी मिळणार आहे.

भाविकांच्या संख्येत वाढ होणार
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिल्यामुळे अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. आतापर्यंत ४००९ भाविकांनी अर्ज केले. गेल्या तीन वर्षांपासून हजला जाणाऱ्या भाविकांच्या कोट्यात २५ टक्के कपात करण्यात आली होती. यंदा तो कोटा वाढण्याची शक्यता आहे. अर्ज केलेल्या भाविकांना १५ ते २३ मार्चपर्यंत नंबर लागला की नाही तसेच वेटिंग लिस्ट किती आहे, याची माहिती मिळेल. ज्यांचे नंबर लागले त्या भाविकांना एप्रिलपर्यंत ८१ हजार रुपयांचा पहिला हप्ता भरावा लागणार आहे. विमान भाडे जाहीर झाल्यानंतर दुसरा हप्ता भरावा लागेल. इच्छुकांना विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र स्टेट हज कमिटी, साबू सिद्दिक मुसाफिरखाना, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई-४००००१ या पत्यावर पाठवता येतील, अशी माहिती पटेल यांनी दिली.

परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा
^हजयात्रेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अनेकांनी माझ्याकडे केली होती. याविषयी मी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी रविवारी बोललो. त्यानुसार अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. -एकनाथ खडसे, अल्पसंख्याक मंत्री