आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटी रद्द करा, सीईटी घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - परीक्षा परिषदेकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या (टीईटी) शिक्षक पात्रता परीक्षेची नमुना उत्तरपत्रिका संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. त्यात अनेक चुका आहेत. उमेदवारांची आर्थिक लूट करणारी ही परीक्षा रद्द करून सीईटी ही एकच परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी डीटीएडधारक विद्यार्थी कृती समितीने परीक्षा परिषदेकडे केली आहे.

शासनाच्या वतीने या वर्षीपासून शिक्षक पात्र होण्यासाठी पात्रता परीक्षा जाहीर केली. 15 डिसेंबर रोजी राज्यातून 6 लाख तर औरंगाबाद विभागातून 30 हजार उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके खरेदी करून अभ्यास केला. मात्र टीईटीमध्ये विचारण्यात आलेले बरेच प्रश्न हे अभ्यासक्रमावर आधारित नव्हते. एनसीईआरटीच्या नियमानुसार 40 टक्के प्रश्न उपयोजनात्मक असायला हवे होते. त्याजागी एमपीएससी, एसटीआयमध्ये जसे प्रश्न विचारले जातात. तसे प्रश्न विचारण्यात आले. संकेतस्थळावर टाकलेल्या नमुना उत्तरपत्रिकामध्येही चुका आहेत. अनेक प्रश्नांना चुकीचे पर्याय देण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 132 मध्ये रिकाम्या जागेत जगातील सर्वात मोठे बेट आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर ऑस्ट्रेलिया असे दाखवण्यात आले आहे. जे चूक असून बरोबर उत्तर ग्रीनलँड आहे. तसेच प्रश्न क्रमांक 127 मध्येही अशीच चूक करण्यात आली आहे. अशा प्रकारामुळे ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय या परीक्षेच्या पात्रतेनंतरही नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही.

परीक्षेचा ताण आणि नोकरीही नाही. शिक्षकांच्या भविष्याचा विचार करून टीईटी रद्द करून त्याऐवजी सीईटी घेऊन त्यांना वेळेत नोकरी द्यावी, अशी मागणी डीटीएडधारक विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष संतोष मगर यांनी केली आहे.