आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटी उत्तीर्ण झाल्यास नोकरी मिळेल काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वर्षभरापूर्वी झालेल्या पटपडताळणीत राज्यातील 10 हजार, तर औरंगाबाद शहरातील 250 शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यांना अद्यापही शिक्षण विभागाने पदनियुक्ती दिली नाही. आता शासनाने पुन्हा टीईटी घेतली. मात्र, हजारोच्या संख्येने उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांना नोकरी मिळेल काय, असा प्रश्न पडला आहे.

तीन वर्षांपासून शिक्षकांची सीईटी परीक्षा झाली नव्हती. त्यानंतर आता शासनाने शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) या वर्षीपासून लागू केली. 15 डिसेंबर रोजी राज्यातून 6 लाख, तर औरंगाबाद विभागातून 30 हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. यात 60 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्‍यांना सीईटी परीक्षा देता येईल, असे बोलले जात आहे. या सीईटीमधील गुणवत्ताप्राप्त उमेदवारांना शिक्षक पदासाठी पात्र ठरवले जाईल, अशीही चर्चा आहे. मात्र, अशा सीईटीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तथापि, अशा अनेक सत्त्वपरीक्षा देऊनही उमेदवारांना नोकरी मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. 2009 पूर्वी सीईटी उत्तीर्ण झालेल्या 3 हजार 500 उमेदवारांना अद्याप नोकरी नाही. शिवाय वर्षभरापूर्वी झालेल्या पटपडताळणीत अतिरिक्त ठरलेल्या 250 शिक्षकांना अद्याप नियुक्त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे आता टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रिक्तपदांची माहिती घेणे सुरू
शासनाच्या आदेशानंतरच जागा भरल्या जातील. सध्या रिक्त जागांची आणि समायोजित शिक्षकांची माहिती घेणे सुरू आहे. सुखदेव डेरे, शिक्षण उपसंचालक

सीईटीबद्दल माहिती नाही
शासनाकडून टीईटी घेण्याचेच आदेश होते. त्यामुळे सीईटी होणार आहे की नाही, हे सांगता येणार नाही. सध्या आम्ही टीईटीच्या नमुना उत्तरपत्रिका संकेतस्थळावर टाकण्याचे काम सुरू केले आहे. दिलीप सहस्रबुद्धे, आयुक्त, परीक्षा परिषद पुणे

परीक्षा घ्या, पण नोकरी द्या
शासनाने 2009 नंतर यंदा टीईटी परीक्षा घेतली. यामुळे भावी शिक्षकांमध्ये नोकरीची आशा निर्माण झाली आहे; परंतु हे केवळ मृगजळ आहे. नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही. आमची कोणतीही परीक्षा घ्या, पण नोकरी द्या, एवढीच मागणी आहे. संतोष मगर, डीटीएड कृती समिती अध्यक्ष

आता तरी नोकरी मिळावी
डीटीएड होऊन तीन वर्षे झाली आहेत. आता कुठे टीईटी परीक्षा झाली; परंतु नोकरी मिळालेली नाही. त्यात संस्थांमध्ये बिनपगारी काम करावे लागते. शासनाने तरुण बेरोजगारांचा विचार करायला हवा. सुनील कांबळे, परीक्षार्थी