आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगा साहेब, पेरणी कशी करू? हतबल शेतकऱ्याने उद्धव ठाकरेंसमोर ठेवले साडेतीन हजार रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. - Divya Marathi
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
औरंगाबाद- ठाकरे साहेब, डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. आता पेरणीसाठी कुणीच कर्ज द्यायला तयार नाही. जमापुंजी मिळून माझ्याजवळ फक्त साडेतीन हजार रुपये शिल्लक आहेत. तुम्हीच सांगा या पैशात पेरणी कशी करू, असा प्रश्न करत हताश झालेले पळशीचे शेतकरी नानासाहेब पळसकर यांनी चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पैसे ठेवले. हे पाहून ठाकरे यांनाही गलबलून आले. कर्जमाफीऐवजी शिवसेना थेट कर्जमुक्ती करण्याची मागणी करत आहे. शेतकऱ्यांनी साथ दिल्यास टोकाची भूमिका घेऊन तुम्हाला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले. 
 
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियातून मराठवाड्यातील ४८ विधानसभा मतदारसंघांत ४८ आमदार, नगरसेवकांनी शेतकऱ्यांशी आणि सामान्य जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचा आढावा घेण्यासाठी ठाकरे रविवारी शहरात आले होते. सुभेदारी विश्रामगृहात पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक यांच्यासोबत चर्चा करण्यापूर्वी ठाकरे यांनी पळशी, ओहर, मोहर, कच्ची घाटी आदी ठिकाणच्या १८ शेतकऱ्यांशी संवाद साधला. संघटना बांधणीसह शेतकऱ्यांचे प्रश्न समजण्यासाठी शिवसंपर्क अभियान हाती घेण्यात आले आहे.
 
या वेळी शेतकऱ्यांचे सर्वाधिक आणि महत्त्वाचे प्रश्न असल्याचे दिसून आले. कर्जमाफीचा विषय गंभीर असल्याने शिवसेना आपल्यासोबत असल्याचे सांगून कर्जमाफी नव्हे तर, कर्जमुक्तीसाठी आमची तयारी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. आता शेतकऱ्यांवर कर्जापायी ही वेळ येऊ नये, यासाठीच आमचे प्रयत्न सुरू राहतील, असे ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
 
तुरीला भाव नाही. खरेदीही बंद आहे. कांद्यालाही भाव नाही. एकंदरीत शेतीमालाचा भाव कमी झाला असून आम्ही काय करावे, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. त्यावर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही शेवटपर्यंत लढणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांमध्ये प्रतिनिधी म्हणून नानासाहेब पळसकर, दामोदर शेळके, शेख सुलतान शेख कालूभाई आदींचा समावेश होता. या वेळी पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, आमदार अर्जुन खोतकर, संजय शिरसाठ, नागेश पाटील आष्टीकर, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, शहरप्रमुख राजू वैद्य, सभागृह नेता गजानन मनगटे, नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, ज्ञानेश्वर डांगे आदींची उपस्थिती होती. 
 
शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले 
ठाकरे यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आले होते. त्यांच्यापैकी कुणाचेच गाऱ्हाणे ऐकता त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. शेतकऱ्यांनी दिलेले निवेदनही स्वीकारले. तीन पानी निवेदनात शेतकऱ्यांनी समृद्धी मार्गाला विरोध करून या मार्गाची गरज नसल्याचे म्हटले. अगोदरच साडेसहा हजार हेक्टर जमीन शासनाच्या ताब्यात अाहे. त्यावर काहीच केले नाही. त्यानंतरही आता सुपीक जमिनीवर डोळा ठेवून त्या ताब्यात घेण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. निवेदनावर योगेश दांडगे, भाऊसाहेब घुगे, कल्याण डुगले, सुभाष बरडे, संपत दांडगे, भाऊसाहेब शिंदे, किशोर जाधव, प्रशांत गाडे, भाऊसाहेब कोलते, अंकुश दांडगे, ओमप्रकाश अट्टल आदींची नावे आहेत. 
 
महिला आघाडीला दाखवला बाहेरचा रस्ता 
शहरातील सर्वच पदाधिकारी, नगरसेवक सुभेदारीवर आले होते. तसेच मराठवाड्यातील आमदार, खासदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते अाल्याने एकच गर्दी झाली होती. त्यामुळे स्वागत स्वीकारण्याचे प्रकार कमीच झाले. शहरातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र ठाकरे यांचा दोनदा सत्कार करण्याचा प्रयत्न केला; पण वरिष्ठ नेत्यांनी दोन्ही वेळेला हा प्रयत्न हाणून पाडत त्यांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला. यामुळे महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

हेही वाचा...
समृद्धी मार्गाला शिवसेनेचा विरोधच; सोन्यासारखी जमीन काढून रस्त्यावर आणणे विकास नव्हे- उद्धव

 
बातम्या आणखी आहेत...