आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश उत्सव: थर्माकोलचा वापर पर्यावरणाला घातक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गजमुख आणि मनुष्यदेह धारण करणारा बाप्पा पर्यावरण आणि माणसाच्या जीवनातील समतोलाचे महत्त्व सांगतो. मग या निसर्गाच्या देवतेला थर्माकोल कशाला? दरवर्षी गणेशोत्सवात थर्माकोल आणि प्लास्टिकची आरास केली जाते. त्यामुळे पर्यावरणाला घातक शेकडो टन निर्माल्य जमा होते. या वर्षी काही भक्तांनी आपला ‘बाप्पा’ हा इको फ्रेंडली करण्याचा निश्चय केला. त्यासाठी पानं-फुल आणि क्राफ्ट पेपरचा उपयोग करण्याचा संकल्प केला आहे. गणेश महासंघदेखील अशा मंडळाची विशेष दखल घेणार आहे.

गेल्या वर्षी शहरातून पर्यावरणाला घातक असलेले 50 ट्रॅक्टर निर्माल्य जमा झाले होते. यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसह, थर्माकोलचे मखर, प्लास्टिकचे डेकोरेशन साहित्य, प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, कागद यांचा समावेश होता. हे ‘ऑर्गेनिक पॉलिमर’ असून यात मोठय़ा प्रमाणावर कार्बन असते. त्यामुळे ते न कुजता पर्यावरणाला धोका निर्माण होतो. हे सर्व साहित्य एकत्र केलेल्या परिसरातील जमीन नापीक होते. विशेष म्हणजे हा कचरा पाण्यात मिसळल्यास रोगराई पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणाचा मंत्र देणार्‍या गणेशाच्या उत्सवात अशा प्रकारे पर्यावरणाचा र्‍हास करणार्‍या गोष्टी करू नयेत, असे आवाहन पर्यावरणमित्र संघटनांनी केले आहे. तर पर्यावरणाचे नुकसान न करणार्‍या मंडळाची विशेष नोंद घेऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सिडको-हडको गणेश महासंघाचे शिवा लुंगारे यांनी सांगितले.

थर्माकोलऐवजी हे वापरा
थर्माकोलऐवजी पाना-फुलांचा वापर केल्यास दर दोन दिवसांनी वेगवेगळे डेकोरेशन करण्याची संधी मिळू शकते. हे सजीव डेकोरेशन डोळ्यांना आनंद देणारे असते. सजावटीसाठी विविध रंगांच्या रांगोळ्यांसह क्राफ्ट आणि विविध रंगांत येणार्‍या फ्लुरोसंट कागदाचाही उपयोग करता येईल. विविध रंगांचे कापड आणि लाकूड वापरून रंगांच्या साहाय्याने आकर्षक तयार केलेल्या वस्तूंनी मोठय़ा मंडळाची सजावट होऊ शकते.

ऑर्गेनिक पॉलिमर
थर्माकोल हे सिंथेटिक ऑर्गेनिक पॉलिमर आहे. त्यात मोठय़ा प्रमाणावर कार्बनचे प्रमाण असते. त्यामुळे ते कुजतही नाही आणि विरघळत नाही. त्यामुळे ते पर्यावरणाला मोठय़ा प्रमाणावर घातक आहे.
-डॉ. अलकनंदा दोडके-सुपेकर, विभागप्रमुख, रसायनशास्त्र विभाग, स.भु. विज्ञान महाविद्यालय

निसर्गाची देवता
निसर्गाच्या रक्षणाची शिकवण देणार्‍या बाप्पाला प्लास्टिक आणि थर्माकोलचा नैवेद्य का म्हणून द्यायचा? आपण केलेली प्रत्येक चांगली गोष्ट त्याला आवडते. सजावटीसाठी कागद, रांगोळी याचाही चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो.
-उदय भोईर, प्राचार्य, रविवर्मा महाविद्यालय