आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूशी झुंज देणा-या ‘त्या’ महिलेला मिळाले रक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लिव्हर सिरॉसिसमुळे नाशिकच्या खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणा-या महिलेला इंदूर, नाशिक, अहमदनगर येथील रक्तपेढ्यांनी ‘बॉम्बे ब्लड गु्रप’चे रक्त उपलब्ध करून दिले आहे. रक्ताच्या या दुर्मिळ गटाविषयी रविवारी ‘दिव्य मराठी’त बातमी प्रसिद्ध होताच 12 तासांत आशा राजेंद्र सोनवणे (48) यांना बॉम्बे ब्लड गु्रपचे दोन युनिट मिळाले आहेत. इंदूरचे एक युनिट सोमवारी मिळेल.


या रक्तगटाच्या देशभरात 179 व्यक्ती आहेत. इंदूर येथे दैनिक भास्करमध्ये हे वृत्त वाचून दामोदर युवा संगठनचे संचालक अशोक नायक यांनी आशा यांचे नातेवाईक अनिल शेलार यांना नाशिकमध्ये फोन करून 24 तासांत एक युनिट रक्त उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. नाशिकच्या जनकल्याण रक्तपेढीनेही रविवारी सकाळी या रक्तगटाचे एक युनिट रक्त उपलब्ध केले असून त्यांच्याच अहमदनगर शाखेतही आणखी एक युनिट रक्त असल्याचे सांगण्यात आले. चांदवड (नाशिक) येथील प्रकाश साबळे यांनी ‘जनकल्याण’मध्ये रक्तदान केले आहे. आशा यांना गेल्या वर्षभरापासून यकृताचा आजार आहे. अनेक रुग्णालयांत दाखवूनही त्याचे अचूक निदान झाले नव्हते. तीन दिवसांपूर्वी नाशिकच्या देवगावकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा बॉम्बे ब्लड गु्रप असल्याचे उघड झाले. त्यानंतर प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना दुस-या रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी संबंधित रक्तगटाचे तीन युनिट उपलब्ध करण्यास सांगितले होते. अथक प्रयत्न केल्यानंतरही रक्त मिळत नव्हते. पण ‘दिव्य मराठी’च्या बातमीनंतर ते रविवारी उपलब्ध झाले आहे.


रक्तगट उपलब्ध करू
हा ग्रुप अतिशय दुर्मिळ आहे. आमच्या रक्तपेढीत बॉम्बे ब्लड गु्रपच्या रक्तदात्यांची नोंद असल्याने बंगळुरू किंवा मुंबईहून हे रक्त उपलब्ध केले जाईल. आशा यांच्या नातेवाइकांना फोन करून तशी माहिती सकाळी देण्यात आली आहे.
अशोक नायक, संचालक, दामोदर युवा संगठन, इंदूर.


दोन युनिट तयार
सोनवणे यांच्यासाठी रविवारी सकाळी एक युनिट रक्त साठवून ठेवण्यात आले आहे. आणखी एक युनिट अहमदनगरमधील आमच्या शाखेच्या रक्तपेढीत उपलब्ध केले आहे. बंगळुरूच्या धर्तीवर राज्यातही बॉम्बे ब्लड गु्रपच्या लोकांनी कम्युनिटी तयार करायला हवी, जेणेकरून या रक्तगटाचा तुटवडा जाणवणार नाही.
विनय शौचे, प्रशासकीय अधिकारी, जनकल्याण रक्तपेढी, नाशिक.