आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेशन दुकानावर मिळणार आता पाच किलोचे सिलिंडर; 370 रुपये किंमत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गॅस सिलिंडरच्या बाबतीत अनेकदा वेळेवर मिळत नसल्याची समस्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसतो. मात्र आता रेशन दुकानावर देखील ५ किलोचा सिलिंडर उपलब्ध होणार आहे. ३७० रुपयात हे सिलिंडर ग्राहकांना मिळणार आहे. दर महिन्याचे त्याचे दर वेगळे असणार आहेत. साधारण आठवडाभरात रेशन दुकानदारांना हे सिलिंडर उपलब्ध होणार आहे.    


बुधवारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनात  बैठक घेण्यात  आली. यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम, रेशन दुकानदार  संघटनेचे राज्याध्यक्ष डी.एन. पाटील तसेच एचपीसीएल, भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन आणि इंडियन ऑइल काॅर्पोरेशन या तिन्ही कंपन्यांचे अधिकारी  या बैठकीला उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यात रेशन दुकानांची संख्या १८०० आहे. यामध्ये शहरात १९९ दुकाने आहेत. या माध्यमातून ३७० रुपयांत हे पाच किमीचे सिलिंडर मिळणार आहे. यासाठी रेशन कार्डची आवश्यकता नाही. कोणालाही हे सिलिंडर घेता येणार आहे. ग्रामीण भागात अनेक वेळा सिलिंडर घेण्यासाठी तालुक्यांना जावे लागते. त्यामुळे जाण्याचा खर्च, त्यातच वेळेवर ते मिळेल की नाही याची कोणतीही हमी नसते.  मात्र रेशन दुकानावर सिलिंडर उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामीण  भागात काहीसा दिलासा मिळणार आहे.    

 

एका वेळी २० सिलिंडर ठेवण्याची परवानगी 

रेशन दुकानदारांना यासाठी १५ रुपये प्रतिसिलिंडर कमिशन मिळणार आहे. एकाच वेळी २० सिलिंडर ठेवण्याची परवानगी दुकानदारांना आहे. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. ग्राहकांना हे सिलिंडर घेण्यासाठी १२७० रुपये सिलिंडरची किंमत द्यावी लागणार आहे. यामध्ये सिलिंडर,रेग्युलेटर, सिलिंडरची नळी असे किट सोबत मिळणार आहे. 

 

१४ किलोच्या सिलिंडरसाठी ६४८ रुपये

ग्राहकांना १४.२ किलोचे सिलिंडर सध्या ८४८ रुपयांना मिळते. यामध्ये सबसिडीच्या रूपात २४८ रुपये त्याच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे साधारण ६४८ रुपयांना १४.२ किलोचे सिलिंडर मिळते. या तुलनेत पाच किलोचे सिलिंडर महाग असले तरी ग्रामीण भागात याचा वापर मोठ्या प्रमाणात होईल, अशी रेशन दुकानदारांना आशा आहे.

 

रेशन कार्डची गरज नाही
रेशन दुकानावर सिलिंडर कोणालाही घेता येणार आहे.  डीलर्स आणि रेशन दुकानदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यासाठी त्यांना २० सिलिंडर ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.     
-भारत कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी

 

ग्रामीण भागात फायद्याचे
 आठवडाभरात आम्ही हे सिलिंडर लोकांना उपलब्ध करुन देणार आहोत. ज्याचे कमिशन आम्हाला जास्त मिळेल त्या कंपनीचे सिलिंडर आम्ही घेणार आहोत.
-डी.एन.पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटना

बातम्या आणखी आहेत...