आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ एकर जमिनीचाही लष्कराने घेतला ताबा, आजही घेणार आणखी दोन जागांचा ताबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संरक्षण मंत्रालय छावणी परिषद प्रशासनाने बनेवाडी येथील सर्व्हे नंबर १६ मधील जमीन न्यायालयाच्या आदेशानुसार ताब्यात घेतली. पोलिस बंदोबस्तासह क्यूआरटीच्या उपस्थितीत शुक्रवारी ही कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, शनिवारीही दोन जागांचा ताबा घेण्यात येणार आहे.
बनेवाडीतील या जमिनीवर विश्वनाथ इंगळे पिके घेत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार मौजे बनेवाडी येथील सर्व्हे नं. १६ मधील या २४ एकर १४ गुंठे जमिनीचे मालक इस्माईल खान होते. खान यांचे वारस मोहंमद उस्मान आणि इंगळे यांचे वडील यांच्यातील दावे विविध न्यायालयात प्रलंबित होते. त्यातील काही प्रकरणांत उच्च न्यायालयाने इंगळे यांच्या वडिलांच्या बाजूने निकाल दिला होता. विश्वनाथ इंगळे यांचे वडील या जमिनीचे ताबेदार होते. त्यामुळेच विश्वनाथ इंगळे यांनी वीजजोडणी घेऊन नदीतून पाणी घेतले. त्यासाठी सन १९५८, १९६० आणि १९६९ मध्ये पाणीपट्टीही भरली होती. दरम्यान, वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर विश्वनाथ हेच जमीन कसत होते.

मालकी हक्कावरून वाद
छावणी रक्षाभूमीच्या अधिकाऱ्यांनी सन २००८ मध्ये विश्वनाथ इंगळे यांना या शेतजमिनीचा ताबा सोडण्यास सांगितले. काहीही संबंध नसताना छावणी रक्षाभूमीचे काही कर्मचारी जमीन कसण्यात अडचणी निर्माण करत असून त्यांना मज्जाव करावा, असे सांगत इंगळे यांनी छावणीसह पुणे येथील रक्षाभूमी अधिकाऱ्यांविरोधात दिवाणी न्यायालयात धाव घेतली. परंतु इंगळे यांचा दावा चुकीचा असून ही जमीन केंद्र शासनाची आहे. जमिनीची देखभाल रक्षाभूमी अधिकारी करतात, अशी बाजू प्रतिवादींनी मांडली.

तसेच इंगळे यांनीच अतिक्रमण केले असून मोहंमद उस्मान खान आणि विश्वनाथ इंगळे यांच्या न्यायिक वादात प्रतिवादींचा समावेश नव्हता. वीज बिल, पाणीपट्टीच्या पावत्या इंगळे यांचा मालकी हक्क ताबा सिद्ध करू शकत नाहीत. रक्षाभूमी संपदा अधिकारी सन २०१० मध्येच या शेतजमिनीचा ताबा घेतला आहे, असा मुद्दाही प्रतिवादींनी मांडला. दोन्ही बाजूंचे पुरावे युक्तिवाद ऐकून दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जयराज वडणे यांनी विश्वनाथ इंगळे यांचा दावा फेटाळला. इंगळे यांनी याविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करून या आदेशास अंतरिम स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. मात्र, त्यांचे अपील निरर्थक असल्याचे ही जमीन ताब्यात घेतली असल्याचे रक्षाभूमी छावणीतर्फे निदर्शनास आणून देण्यात आले.

त्यामुळे तत्कालीन जिल्हा न्यायाधीश क्र. एस. आर. कदम यांनी इंगळे यांचा अर्ज फेटाळला. या प्रकरणात रक्षाभूमी यांची बाजू केंद्र शासनाचे अतिरिक्त विधी सल्लागार अॅड. संदीप राजेभोसले यांनी मांडली. छावणी परिषदेतर्फे अॅड. दामोदर सोमण यांनी काम पाहिले. शुक्रवारी इंगळे यांच्या ताब्यातील आठ एकर जमिनीचा ताबा घेण्यात आला.

अतिक्रमण हटवले
रक्षाभूमी उपविभागीय अधिकारी पराग कोकणे, विशाल मोहिते, हर्षद क्षीरसागर तसेच छावणी परिषदेचे सहायक अभियंता नीलेश तनपुरे, कुणाल पाटील, अॅड. संदीप बी. राजेभोसले, कर्नल आर. शर्मा, कर्नल महाडिक, स्टेशन कमांडर ब्रिगेडियर अनुराग वीज, पोलिस उपनिरीक्षक आरिफ शेख यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवून जमिनीचा ताबा घेण्यात आला. शनिवारी उर्वरित दोन जमिनी ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...