आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा-देवळाईसाठीच्या २०० कोटींवर शिरसाट, खैरेंचा डोळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मोबाइलची मेसेज ट्यून वाजते. लोक व्हॉट्सअॅपवर जाऊन मेसेज पाहतात. त्यातील ऑडिओ क्लीप डाऊनलोड करताच ‘सातारा देवळाई नगर परिषद नाही कुणाच्या बापाची’ असे वाक्य ऐकू येते. मग साऊंड वाढवला जातो. त्यावर स्थानिक आमदार म्हणजे संजय शिरसाट आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी सातारा परिसराची कशी वाट लावली, याचे वर्णन ऐकायला मिळते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या ऑडिओचा धुमाकूळ सुरू आहे.
साताऱ्यातील चार वॉर्डांची आगामी िनवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपतर्फे हा प्रचार सुरू असल्याचा दावा शिवसेनेच्या गोटातून केला जात आहे. त्यावर, यातील वक्तव्ये आमची नसली तरी नागरिकांच्या भावनांना वाचा फोडणारीच असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे.
अनेक वाद विवादानंतर साताऱ्याचा सत्ताधाऱ्यंानी मनपामध्ये समावेश केला. या समावेशाला इतर पक्षांसोबतच स्थानिक भाजप कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचाही विरोध होता. पालिकेतल्या समावेशानंतरही विरोध कायम ठेवत त्यांनी आंदोलन सुरू केले. परंतु विरोध केवळ नगर परिषदेसाठी राहता आगामी पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेच्या स्थानिक आमदार, खासदारांविरोधात प्रचार करण्यास सुरुवात केल्याचे या ध्वनिफितीवरून स्पष्ट होत आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या ध्वनिफितीमध्ये खासदार,आमदार पालकमंत्र्यांवर टीका करण्यात आली आहे. शहराचा विकास केलेले सातारा देवळाईचा विकास काय करणार,असा प्रश्न उपस्थित करून परिसरासाठी मिळणाऱ्या २०० कोटींच्या निधीवर सत्ताधाऱ्यांचा डोळा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनपामध्ये समावेश होताच शिवसेनेने सातारा देवळाईवर अधिकच लक्ष देण्यास सुरुवात केली. तसेच शिरसाटांच्या मतदारसंघात हा भाग असल्याने येत्या पोटनिवडणुकीत थेट त्यांनाच लक्ष्य करून अधिकाधिक मतदारांना वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे.
साताऱ्यात नुकतेच नगर परिषदेसाठी आंदाेलन झाले. त्यात सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले, तरी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे, व्यापारी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते. याच गटाकडून या ध्वनिफितीचा प्रसार करण्यात आला होता.
खाली मुंडके-वर पाय
सध्याचे आमदार, खासदार गरिबांच्या टाळूवरचे लोणी खाणारे असून अशा खासदार,आमदारांचे "खाली मुंडके-वर पाय' करण्याची धमकी ध्वनिफितीत दिली आहे. ध्वनिफितीत खासदार,आमदारांचे थेट नाव घेतले नसले तरी स्थानिक म्हटल्याने शिरसाट खैरे यांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.
कारवाई करू
- पदाधिकाऱ्यांच्या त्या ध्वनिफितीशी पक्षाचा संबंध नाही, तरीही त्या आंदोलनात सहभागी होऊन पक्षाविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर वरिष्ठांशी बोलून कारवाई केली जाईल.
ज्ञानेश्वर बोरसे, भाजप मंडळ अध्यक्ष, सातारा-देवळाई.