आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमअायटीच्या दाेन विद्यार्थ्यांचा साताऱ्यातील तलावात बुडून मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा तांड्याजवळील डोंगराला लागून असलेल्या तलावात बुडून दोन महाविद्यालयीन युवकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. सातारा पोलिस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. चिन्मय कुलकर्णी (१८, रा. भारतमाता कॉलनी, देवळाई) विवेक चौधरी (१८, रा. नाईकनगर, देवळाई) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. हे दोघेही सातारा परिसरातील एमआयटी पॉलिटेक्निक महाविद्यालयात इलेक्ट्रिकल विषयाच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होते. या दोघांसोबत त्यांचे चार मित्रही होते. त्यांनी या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.
अवघ्या काही मिनिटांत मित्रांची दुनियादारी उद््ध्वस्त झाली. हा सारा प्रसंग चिन्मय, विवेकला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या मित्रांच्याच शब्दांत....

तन्मयने (नाव बदललेले आहे) सांगितल्यानुसार, बुधवारी दुपारी १२ वाजता जेवणाची सुटी झाली. एक तासाचा वेळ होता. श्रेयस महाविद्यालयाजवळील तळे भरले असल्याचे कळाले होते. शिवाय काही प्रोजेक्ट्सवर एका मित्रासोबत चर्चाही करायची होती. म्हणून एखाद्या आल्हाददायक ठिकाणी जावे असा विचार आमच्यापैकी कोणीतरी बोलून दाखवला. मग साऱ्यांनी त्याला आनंदात होकार दिला. ज्याच्याशी प्रोजेक्टबद्दल बोलायचे होते तोदेखील महाविद्यालयाबाहेर भेटू, असे म्हणाला. आम्ही दहा-बारा मित्र तळ्याच्या दिशेने निघालो. ज्या मित्राला भेटायचे होते त्याची भेट झाली नाही म्हणून आम्ही डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तलावाजवळ गेलो. तलाव पूर्ण भरलेला होता. खूप नयनरम्य दृश्य होते. काही मित्र टेकडीवर जाऊन बसले, तर काही जण परत गेले. आम्ही सहा जण तलावाच्या काठावरच बसलो होतो. काही वेळानंतर कपडे काढून पाण्यात खेळायला सुरुवात केली. दहा-पंधरा मिनिटे खेळल्यानंतरही खोलीचा अंदाज कुणाला आला नव्हता. आम्ही पाण्यात डुबक्या मारत असताना विवेक चिन्मयने आमच्या डोक्यावरून पाण्यात जोरात उड्या मारल्या. आम्ही डोके वरती काढले असता विवेक दिसतच नव्हता, तर चिन्मय गटांगळ्या खात होता. प्रकरण गंभीर असल्याचे माझ्यासह सर्वांच्या लक्षात आले. मग आम्ही चार मित्रांनी तत्काळ एकमेकांचे हात धरून साखळी करत त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. प्राण एकवटून खूप ताकद लावली. मात्र, आमचेही पाय सटकायला सुरुवात झाली. तरीही आम्ही त्यांना ओढत होतो. अखेर दम लागला आणि हात सुटला. टेकडीवर बसलेले मित्र हे बघत होते.

हात सुटल्यानंतर सगळे ओरडायला लागले. काहीच सुचत नव्हते. आमचे जवळचे मित्र बुडतील, असे आम्हाला वाटलेसुद्धा नव्हते. मग काही मित्र पळतच श्रेयस महािवद्यालयात गेले. तेथून मदतीसाठी काही लोक आले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. काही वेळाने अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. आमचे मित्र वाचतील, असे आम्हाला खूप वाटत होते. त्यांना पाण्याबाहेर काढून तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले. ते वाचतील यासाठी देवाकडे प्रार्थना करत होतो. मात्र, ते आता आमच्यात नसल्याचे कळतेय. खरे काय माहीत नाही.
विद्यार्थ्यांचे मृतदेह तलावातून बाहेर काढल्यानंतर तलाव परिसरात अशी गर्दी झाली होती. दुसऱ्या छायाचित्रात घटनास्थळाचा पंचनामा करताना सातारा पोलिस.

पोलिसांची धाव : चिन्मयच्या वडिलांचा इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय असून विवेकचे वडील पीईएस महाविद्यालयामध्ये लॅब असिस्टंट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहा.पोलिस आयुक्त मीना मकवाना, सातारा ठाण्याचे निरीक्षक बी. डी. काकडे घटनास्थळी पोहोचले. अग्निशामकचे डी. डी. साळुंके, व्ही. आर. दिनकर, कृष्णा होळंबे एस. एस. दुधे यांनी त्यांना बाहेर काढले.
पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर बातमी...
बातम्या आणखी आहेत...