आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Decision Will Permanent Of The Class Attendance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरटीईच्या निकषामुळे पुन्हा मराठी शाळांवर गंडांतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यात सध्या ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि पहिली ते सातवी, तर काही मोजक्याच ठिकाणी 5 वी ते १० वीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. त्यात पुन्हा आरटीईच्या निकषानुसार यापुढे राज्यात पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा प्रकारच्या शाळा असतील. या निकषामुळे पुन्हा एकदा मराठी शाळांवर गंडांतर येणार असून, हा अन्याय आहे, असे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
सरकारने पुन्हा एकदा शिक्षणाचा खेळ लावला असून, शहरी भागासाठी २५ आणि ग्रामीण भागासाठी २० पट संख्या असणारे वर्गच सुरू राहतील, असे सांगत पूर्वी घेतलेला पटसंख्येवर वर्ग तुकडीचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठेवणार नाहीत. या पटसंख्येच्या निकषामुळे राज्यातील हजारो वर्ग तुकड्या, शाळा बंद होण्यापासून वाचल्या. मात्र, नुकतीच शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली नवीन वर्ग तुकड्या शाळा यांना मंजुरी देत असताना आरटीईनुसार पटसंख्येचे निकष ठरवण्याबाबत एक समिती गठित करण्यात आली होती. त्या समितीने काही दिवसांपूर्वी आपला अहवाल सादर केला आहे. तो शाळांच्या आणि शिक्षकांच्या दृष्टीने अन्यायकारक असल्याच्या शिफारशी करण्यात आल्याचे आमदार काळे यांनी म्हटले आहे. जर ३० जुलैच्या पटसंख्येवर पूर्वीप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी संचमान्यता केली, ती पारदर्शक असली तर मराठी शाळा टिकेल, अन्यथा इंग्रजीची खैरात वाटणाऱ्या सरकारमुळे मराठी शाळांवर पुन्हा एकदा गंडांतर येईल, अशी भीती काळे यांनी व्यक्त केली आहे.
यापुढे पहिली ते पाचवी या वर्गात दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास पहिलीचे मुख्याध्यापक आणि पाचवीचे शिक्षक मिळणार आहेत. मात्र, शाळेत दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्या झाल्यास ती शाळा बंद करण्यात येणार आहे.
सहावी ते आठवी या वर्गांत १०५ पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास शिक्षक मिळणार आहेत. मात्र, ही शाळा प्राथमिक शाळेस जोडलेली असल्यास प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक हाच या शाळेचा मुख्याध्यापक राहील. सहावी ते आठवी तिन्ही वर्गांत मिळून ३७ पेक्षा कमी विद्यार्थी झाल्यास ती शाळा बंद करण्यात येणार आहे.
पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशी शाळा असेल. यानुसार जिल्हा परिषदेला पहिली ते चौथीच्या शाळेला खासगीचे पाचवी आणि आठवीचे वर्ग जोडावे लागतील. यामुळे खासगी शाळेस फक्त नववी आणि दहावी असे दोनच वर्ग असतील. मग दोन वर्गांवर शाळा कशी चालणार? असा सवाल शिक्षकांनी केला आहे.