आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांच्या हस्तक्षेपाने निवडणूक प्रतिष्ठेची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींची निवडणूक आजी-माजी आमदारांनी प्रतिष्ठेची केली असून उमेदवारी अर्ज भरण्याबरोबरच जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. पैठण तालुक्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे ग्रामीण भागात जाळे आहे. भाजप नावालाच असल्याने ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुका या तीन राजकीय पक्षांतच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या निवडणुकानंतर बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम लागणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले सदस्य बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे आणि माजी आमदार संजय वाघचौरे, काँग्रेसचे रवींद्र काळे यांनी जोरदार तयारी चालवली आहे.
विलास भुमरे यांच्यावर जबाबदारी
आमदार संदिपान भुमरे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पुत्र विलास भुमरे यांच्यावर सोपवली आहे. उमेदवारी कोणाला द्यावी, त्यांचा अर्ज भरण्यापासून ते गावपातळीवर विलास भुमरे लक्ष ठेवून आहेत. तर माजी आमदार वाघचौरे यांनी आपल्या जवळच्या काही कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीची जबाबदारी दिली आहे. काही ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी आजी-माजी सरपंचांनी दोन-दोन पॅनल गावात उभे केले आहेत. पाचोड, आपेगाव, चितेगाव, पिंपळवाडी, रहाटगाव, चांगतपुरी, इसारवाडी, विहामांडवा आदी ग्रामपंचायतीचे पुढारी कामाला लागले .

पॅनल समोरासमोर
जुन्या-जाणत्यांच्या ज्ञानामुळे गावाचा विकास होतो, अशी अनेकांची धारणा असते. परंतु तरुणांनाही आधुनिक ग्रामविकासाची कास असते. त्यामुळे तरुणांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवण्यात आल्याचे दिसून येत आहे. सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. गावागावांत तरुणांचे पॅनल व ज्येष्ठांचे पॅनल उभे आहेत.

स्वत:च्या विकासासाठीच राजकारण
केवळ स्वत:चा विकास होण्यासाठीच राजकारण करणारे आजपर्यंत ग्रामपंचायतीवर निवडून आलेत. त्यामुळे गावाचा विकास खुंटलेला असल्याचे चित्र गावपातळीवर आहे. गावाच्या विकासासाठी आम्ही तरुणांचे पॅनल उभे केले आहे.
साईनाथ सोलाट, पिंपळवाडी
बातम्या आणखी आहेत...