आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खातेनिहाय होणाऱ्या परीक्षेसाठी आता पोलिसांनाच वेगळा नियम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खातेनिहाय होणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी जाहिरात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून सहा महिने आधी सेवेची वर्षे पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. यामुळे २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या परीक्षेपासून सुमारे १९ हजार तरुण पोलिस कर्मचारी वंचित राहणार आहेत. पोलिस विभागालाच इतर विभागांपेक्षा वेगळा नियम का, असा सवाल पोलिस कर्मचारी उपस्थित करत असून परीक्षा देऊ पाहणाऱ्या या उमेदवारांचे स्वप्न भंग पावणार आहे.
महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षकाच्या ८२८ जागा रिक्त आहेत. या जागा खातेनिहाय परीक्षा घेऊन भरल्या जाणार आहेत. ही परीक्षा सध्या शिपाई, पोलिस नाईक, हवालदार, सहायक फौजदार असलेले कर्मचारी देऊ शकतात. मात्र, परीक्षेसाठी संबंधित कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१६ रोजी खात्यात चार वर्षे पूर्ण झाली असावीत, अशी अट घालण्यात आली आहे. या परीक्षेची जाहिरात २७ जून रोजी देण्यात आली आहे. इतर खात्यांत ज्या दिवशी परीक्षेची जाहिरात प्रकाशित केली जाते, त्या दिवसापासून एक महिन्यात खात्यात चार वर्षे पूर्ण झालेली असावीत अशी अट असते. मात्र, एकमेव पोलिस खात्यात ही अट सहा महिने पूर्वीची असल्याने आमच्यासाठीच वेगळा नियम का, असा प्रश्न उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पोलिस खात्यासाठी नियम
कृषी आणि वन विभागातील खातेनिहाय परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होतात, तर पोलिसांचीही परीक्षा आयोगच घेते. तरीदेखील पोलिसांसाठी वेगळा नियम लावला जातो. पोलिस कर्मचाऱ्यांची कुठलीही कर्मचारी संघटना नाही म्हणून त्यांना याविरोधात आवाजही उठवता येत नाही. खात्यात शिस्तीचा बडगा असल्यामुळे कर्मचारी बोलायलाही घाबरतात. याशिवाय बडे अधिकारीही याकडे फारसे लक्ष देत नाहीत.

किमान लोकप्रतिनिधींनी तरी पोलिसांसाठी जाचक ठरणारी ही अट बदलावी, अशी मागणी पोलिस खात्यातील तरुण कर्मचारी करत आहेत. यापूर्वी २०१३ मध्येही उपनिरीक्षक पदासाठी खातेनिहाय परीक्षा घेण्यात आली होती. तेव्हाही सहा महिन्यांचीच अट ठेवण्यात आली होती.

कृषी विभाग
कृषी विभागाकडून कृषी सेवा गट बच्या ५० जागा खातेनिहाय भरण्यात येणार आहेत. यासाठी १० जुलै २०१६ रोजी परीक्षा होणार आहे, तर ऑगस्ट रोजी उमेदवाराचे वय ३३ पेक्षा जास्त नसावे, अशी अट टाकण्यात आली आहे. म्हणजे परीक्षा जाहीर केल्याच्या एक महिना पुढे त्यांना वयाची अट पूर्ण करता येऊ शकेल.

वन विभाग
वनविभागाकडून वनक्षेत्रपाल या पदासाठी खातेनिहाय परीक्षा जाहीर करण्यात आली होती. या पदासाठी एप्रिल २०१६ रोजी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. जून २०१६ या तारखेला उमेदवाराचे वय ३३ वर्षांपेक्षा जास्त नसावे, अशी अट होती. म्हणजेच जाहिरात आल्यानंतर पुढे दोन महिन्यांपर्यंत अट पूर्ण करण्याचा कालावधी मिळाला होता.
बातम्या आणखी आहेत...