आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The First Prize Of Cleanliness Jogeshwari Villagers News In Marathi, Divya Marathi

जोगेश्वरी ग्रामपंचायतीला स्वच्छतेचा प्रथम पुरस्कार, ‘आयएसओ’ मानांकनानंतर एक तुरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - एमआयडीसी वाळूजला लागून असलेल्या ‘आयएसओ’ नामांकनप्राप्त जोगेश्वरी गु्रप ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत शाहू, फुले, आंबेडकर दलित वस्ती विकास व सुधारणा स्पर्धेत जिल्ह्यातून पाच लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार पटकावला आहे. निर्मल ग्राम पाटोदाची द्वितीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत कमलापूर, रामराई, नायगाव, जोगेश्वरी व रामराईवाडी अशी पाच गावे येतात. पर्यावरण ग्रामसमृद्ध योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीने पाचही गावांतील प्रत्येकाच्या घरांसमोर विविध झाडांच्या रोपांची लागवड केली आहे.

अंगणवाड्यांचा दर्शनी भाग, जिल्हा परिषदेच्या शाळा, विविध धार्मिक स्थळे व शासकीय जागेत विविध रोपे आणि फळझाडांची लागवड केली आहे. त्यामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले आहे. गरीब व गरजूंना ग्रामनिधीतून 18 लाख रुपये खर्च करून 15 घरकुले बांधण्यात आली. रामराईत बुद्ध मंदिर, नायगाव व बकवालनगरात 22 लाख 50 हजार रुपये खर्चून समाजमंदिराची उभारणी केली आहे.
विविध उपक्रम : ग्रामपंचायतीच्या करदात्याने सर्व कर भरलेला असल्यास त्याचे किंवा त्यांच्या नातलगांचे निधन झाल्यास त्याच्या अंत्यविधीच्या सर्व खर्चाचा भार ग्रामपंचायत प्रशासन उचलत आहे. पाचही गावांतील 50 वर्षे वयापुढील ग्रामस्थांचा वाढदिवस ग्रामपंचायतीतर्फे साजरा केला जात आहे. गावात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत व्याख्याने, कॉर्नर सभा घेऊन जनजागृती सुरू आहे. सांडपाण्याच्या नियोजनासाठी ड्रेनेजलाइन टाकण्यात आली आहे.
पाचही गावाला एमआयडीसीचे पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध क रून देण्यात आले आहे. दर तीन महिन्याला 50 वर्षांपुढील 10 ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या खर्चाने देवदर्शनासाठी पाठवले जाते. शाळकरी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ग्रामनिधीतून दरवर्षी एक हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच मजुरीने कामावर जाणा-या मात्र गरोदरपणामुळे घरी बसलेल्या गरीब व गरजू महिलांना तीन महिन्यांच्या मजुरीची रक्कम ग्रामपंचायतीकडून अनुदान स्वरूपात दिली जाते.
गावातील गरीब व गरजू महिलांना लघुउद्योगासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या महिला व बालकल्याण निधीतून त्यांना मदत दिली जात आहे. त्यातून महिलांनी पापड तयार करणे, पिको मशीन, शिवणकाम आदी गृहोद्योग उभारले आहेत.
गावात 2९ सीसीटीव्ही कॅमेरे
ग्रामनिधीतून सुमारे 9 लाख रुपये खर्च क रून पाचही गावांत 2९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यामुळे अघटित घटनांना पायबंद बसत आहे. जोगेश्वरीतून बाहेर पडण्यासाठी मॉडेल रस्त्याचे काम करण्यात आले. ज्यांनी वर्षभराचा कर आगाऊ भरला आहे त्याला करात 10 टक्के सूट दिली जात आहे.