आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूजला ओढे, नाले दुथडी भरून वाहिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - पावसाच्या रिपरिपीमुळे वाळूज परिसरातील जनजीवन ठप्प झाले होते. सोमवार, मंगळवार असे दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे अनेकांची घरे गळाली. कामगारांना पावसात भिजत कामावर ये-जा करावी लागली. पिकांत पाणी साचल्याने शेतकऱ्यांची घालमेल सुरू असून पावसामुळे खाम नदीसह परिसरातील ओढ्या-नाल्यांना मंगळवारी पूर आला होता.
वाळूज परिसरात सोमवारी भल्या पहाटे पावसाला प्रारंभ झाला. मंगळवारीही दिवसभर अखंडितपणे कधी मुसळधार, तर कधी संततधार सुरू होती. पावसाने दोन दिवस उघडीप दिल्यामुळे वाळूजमधील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले. सर्वत्र चिखल असल्याने अनेकांनी घरातच बसणे पसंत केले. संततधार पावसामुळे सोमवारचा आठवडी बाजारही नेहमीसारखा भरू शकला नाही. व्यापारी भाजी विक्रेत्यांची संख्या कमी होती. बाजारतळावर चिखल साचल्याने ग्राहकही मोजकेच दिसून आले. दिवसरात्र पडणाऱ्या पावसामुळे औद्याेगिक कामगारांना भिजत कंपनीत ये-जा करावी लागली. अनेक कंपन्यांच्या गोदामांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाल्याचेही समोर अाले. वाळूजमधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे झोपडपट्टी, पंढरपुरातील फुलेनगर, वडगाव कोल्हाटीतील आंबेडकरनगर, जोगेश्वरी झोपडपट्टी परिसरातील घरे गळाल्यामुळे अनेकांना रात्र जागून काढावी लागली. वाळूजसह बजाजनगर, पंढरपूर, पिंपरखेड, तिसगाव, गोलवाडी, साजापूर, रांजणगाव शेणपंुजी, घाणेगाव, जोगेश्वरी, कमलापूर, रामराई, नायगाव, लांझी, नारायणपूर, शिवराई, हनुमंतगाव, वाळूजवाडी परिसरातही पाऊस झाला. कमी उंचीच्या वळदगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

टेंभापुरी प्रकल्पात पाण्याची आवक
पावसामुळे लवकी नदी नागझरी नदीला पूर आला आहे. शिवाय ओढे-नालेही भरभरून वाहत आहेत. त्यामुळे वाळूजलगतच्या टेंभापुरी मध्यम प्रकल्पात पाण्याचा ओघ सुरू झाला आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असूून येत्या काही तासांत आणखी मोठा पाऊस झाल्यास प्रकल्प भरेल असे प्रकल्प अधिकारी राजन खापर्डे यांनी सांगितले.

चार वर्षांपासून शेतकऱ्यांचा निसर्गाशी लढा
चारवर्षांपासून वाळूज परिसराला दुष्काळाचा सामना करावा लागला. यंदा पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून मूग, तूर, कापूस, सोयाबीन, मका, ऊस ही पिके चांगली आली. या पिकांना होणारा पाऊस अत्यंत उपयुक्त आहे. मात्र, पिकांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशही तेवढाच महत्त्वाचा घटक आहे. २१ जुलैपासून परिसरात सूर्यदर्शन झालेले नाही. त्यातच दोन दिवसांपासून परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे पिकांमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. यामुळे पिके पिवळी पडून त्यांची मुळे सडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

मुख्य मार्गावर तळे
नगर-औरंगाबादमहामार्गावरील कामगार चौकात असलेल्या पुलांमध्ये गाळ साचल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नव्हता. त्यामुळे वाळूज औद्योगिक वसाहतीतून वाहून आलेले पावसाच्या पाण्याचे मुख्य मार्गावरच तळे साचले होते. यामुळे वाहनधारकांची तारांबळ झाली.
खाम नदी भरून वाहू लागली.

बातम्या आणखी आहेत...