आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आइस्क्रीम विक्रेत्याची दोन्ही मुले मेहनतीने बनली सीए, अहिरे यांची मुलगी पारस झाली चार्टर्ड अकाउंटंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विद्यार्थ्यांनी केलेली अविश्रांत मेहनत आणि त्याला पालकांनी दिलेली साथ यातून यशाला गवसणी कशी घालता येते, हे मांगीलाल अहिरे आणि त्यांच्या दोन मुलांनी सोदाहरण सिद्ध केले आहे. गत ३० वर्षांपासून औरंगपुरा भागात आइस्क्रीमचा गाडा लावणाऱ्या अहिरे यांनी जिद्दीने आपल्या दोन्ही मुलांना सीए केले. त्यांची मुलगी पारसने यंदा या परीक्षेत यश मिळवले असून मागील वर्षी मांगीलाल यांचा मुलगा प्रकाश हाही सीए परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे सीए होणारी पारस ही तिच्या गावातील पहिलीच मुलगी आहे. 

सुमारे ३० वर्षांपूर्वी राजस्थानातील चित्तोडगड येथून उदरनिर्वाहासाठी औरंगाबादेत आलेले मांगीलाल यांचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे. औरंगपुरा भागातील शाळेजवळ आइस्क्रीम विक्री करून त्यांनी कुटुंबाचा चरितार्थ भागवण्यास सुरुवात केली. आपल्याला आल्या तशा अडचणी मुलांना येऊ नयेत, यासाठी त्यांनी मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. दहावी, बारावी अशा प्रत्येक टप्प्यावर चांगले गुण मिळवत मुलांनीही वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली. वडिलांना व्यवसायात मदत करत मोठा मुलगा प्रकाश मागील वर्षी सीए उत्तीर्ण झाला. आत्तापर्यंत किरायाच्या घरात राहणारे हे कुटुंब मुलाने खरेदी केलेल्या घरात राहण्यास गेले. मोठ्या भावाने अथक परिश्रमांतून मिळवलेले यश पाहून पारसने सीए होण्याची इच्छा वडिलांकडे मांडली. 

ज्या गावातून मांगीलाल औरंगाबाद शहरात आले आहे तेथे अजूनही बालविवाहाची प्रथा आहे. मुलींना फारसे शिक्षण दिले जात नाही. अशा वेळी मुलीने विचारलेल्या प्रश्नाने मांगीलाल विचारात पडले. प्रकाशही बहिणीच्या विचारांशी सहमत होता. मुलांची जिद्द पाहून मांगीलाल यांनी पारसला सीएचा अभ्यास करण्यास परवानगी दिली. 
 
गावाकडून आले अाशीर्वाद.. 
निकालजाहीर झाला तेव्हा मांगीलाल राजस्थानातील आपल्या गावी होते. पारस सीए उत्तीर्ण झाल्याचे कळताच त्यांनी अत्यानंदाने मुलीला आशीर्वाद दिले. दोन्ही मुलांनी माझा विश्वास सार्थ ठरवला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 
 
शिकवणी घेतली; १८ तास अभ्यास 
पारसनुकतीच बी.कॉम. उत्तीर्ण झाली आहे. कॉलेज करत ती देवगिरी महाविद्यालयात अकरावी काॅमर्सच्या विद्यार्थ्यांना लॉ हा विषय शिकवत होती. रोज १५ तास सीए फायनलचा अभ्यास करतानाच त्यात दोन तास संगीताचाही सराव सुरू होता. पारस उत्तम गाणेही गाते. अंधकार नावाच्या शाॅर्टफिल्ममध्येही तिने काम काम केले आहे. ही शॉर्टफिल्म यूट्यूबवर आहे. 
 
वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला 
पारसम्हणाली, आमची अर्थिक परिस्थिती बेताचीच होती. आइस्क्रीमचा गाडा चालवताना आम्हाला स्वत:चे घर घेता आले नाही. भाऊ सीए झाल्यावर त्याने घर घेतले. बाबांनी आम्हाला कधीही काही कमी पडू दिले नाही. माझ्या आणि भावाच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नसतानाही त्यांनी कधी त्रागा केला नाही. आम्हीही जिद्दीने अभ्यास करून वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला. 
बातम्या आणखी आहेत...