आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी माणसे किती साधी असतात याचे आदर्श उदाहरण म्हणजे स्व. वसंतदादा- मधुकर भावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: मोठी माणसे किती साधी असतात याचे आदर्श उदाहरण म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील होय. मी जसा आहे, जो आहे तसेच ते वागले. अन्य भाषा येत नाहीत याचा संकोचही त्यांनी कधी बाळगला नाही. प्रत्येकाशी संवाद साधून नेमकी समस्या जाणून घेण्यावर त्यांचा भर होता. ते एकार्थाने महाराष्ट्राचे युगपुरुष होते, असे भावोद्गार ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी काढले. 
 
स्व. पद्मभूषण वसंतदादा पाटील जन्मशताब्दी वर्षानिमित्त एमजीएम संस्थेच्या वतीने रुक्मिणी सभागृहात आयोजित परिसंवादात ते बोलत होते. व्यासपीठावर दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या स्नुषा शैलजा पाटील, दादांसमवेत अनेक वर्षे काम केलेले यशवंत हप्पे, एमजीएम संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, सचिव अंकुशराव कदम यांची उपस्थिती होती. 
 
भावे म्हणाले, वसंतदादांनी कायम भविष्याचा विचार केला. आज शासनाकडून पाणी जिरवण्याचे जे काम केले जातेय त्याची सुरुवात दादांनीच केली होती. तेव्हा सर्वांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. तेव्हाच जर याकडे लक्ष दिले गेेले असते तर आज आपल्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले नसते. राज्यात चार कृषी विद्यापीठे आहेत. ही विद्यापीठे एकीकडे अन् वसंतदादांचे कृषिविषयक विचार एकीकडे आहेत. ग्रामीण भागात खासगी शैक्षणिक संस्था त्यांच्यामुळेच वाढल्या. शेतकऱ्यांची मुले शिकली पाहिजेत यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. 
 
वसंतदादा हे कुटुंबप्रमुख म्हणून कसे होते हे या वेळी बोलताना शैलजा पाटील यांनी सांगितले. हप्पे यांनी वसंतदादांची राजकीय कारकीर्द कशी घडत गेली यावर भाष्य केले. औरंगाबादचे भाऊसाहेब निकम यांनीही या वेळी वसंतदादांचे औरंगाबाद तसेच मुंबई येथील काही किस्से सांगितले. आशा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. 
 
पोलिसांशी सामना करताना एक गोळीही लागली 
स्व.वसंतदादा इंग्रजांविरोधात लढले. पोलिसांशी सामना करताना त्यांना एक गोळीही लागली होती, परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांनी या गोष्टीचा आपणहून कधीच उल्लेख केला नाही. कारण ते माझे काम होते, मी ते केले, त्याचे गोडवे काय गायचे, असे त्यांचे विचार होते, असे भावे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...