आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादूगाराच्या पोतडीत बॉम्ब?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-रेल्वेस्थानकाच्या पार्किंगमध्ये रविवारी विचित्र दृश्य बघायला मिळाले. जादूगाराच्या ओम्नी कारमध्ये सिलिंडरला सर्किट जोडले असल्याचा संशय बॉम्बशोधक व नाशक पथकाला आला. बघ्यांना वाटले कारमध्ये बॉम्ब असावा. या भीतीपोटी एकच खळबळ उडाली. लोक भयभीत झाले. दुपारी दीड ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रेल्वे स्टेशनमधील परिसर सील करण्यात आला होता. पण ‘तो’ बॉम्ब नसून साधे इलेक्ट्रिक सर्किट आढळले अन् सर्वांचाच जीव भांड्यात पडला. दरम्यान, निष्काळजीपणा करणार्‍या जादूगार लक्ष्मण आईदासाणी ऊर्फ ए. लाल (रा. अयप्पा मंदिराजवळ, बीड बायपास) याच्याविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्व सरकारी यंत्रणा चांगलीच कामाला लागली होती.
मनमाड येथे लायन्स क्लबच्या वतीने असलेल्या एका कार्यक्रमासाठी 26 जानेवारी रोजी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास जादूगार आईदासाणी हे पत्नी व मुलासह ओम्नी कारने (एमएच 19 एई 2762) रेल्वेस्टेशनला आले. पार्किंगमध्ये कार उभी करून ते रेल्वे गाडीने मनमाडला गेले. कारच्या गॅस किटमधून गळती होत असल्याने प्रवाशांसह नागरिकांनी दुपारी दीडच्या सुमारास याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला कळवली. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकासह एटीएस, उस्मानपुरा, क्रांती चौक पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
बॉम्बशोधक पथकाचे पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे, सहायक पोलिस निरीक्षक अरुण केंद्रे, सहायक फौजदार ओ. ए. दायमा, के. बी. सोमासे, पी. बी. कोळी, राजेश पोहनकर आणि पोपट आळंजकर यांनी कारची तपासणी केली. गॅस गळती होत असलेल्या ठिकाणी त्यांना 12 बाय 8 साइजची लाकडी पेटी ज्यामध्ये 1.5 व्होल्टेजचे 4 सेल, ऑन ऑफचे इलेक्ट्रिक स्वीच, काळ्या धाग्याची बॉबीन, प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवण्यात आलेली मदार्‍याची पुंगी आढळली. या लाकडी पेटीच्या बाहेरील बाजूला पॉवर स्विच होते. पथकाने कारमधील साहित्य बाहेर काढत त्याची तपासणी केली. मात्र त्यामध्ये धोकादायक वस्तू आढळून आली नाही. तर गॅस गळती मोठय़ा प्रमाणावर होत होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दुपारी चारच्या सुमारास कारमधील गॅसची टाकी बाहेर काढून त्यातील गॅस रिकामा केला. सुमारे 50 लिटर गॅस बसेल एवढी मोठी टाकी कारमध्ये होती. पोलिसांनी कारवर असलेल्या मोबाइल क्रमांकावरून आईदासाणी यांच्याशी संपर्क साधला.