आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Mid term Elections Soon Said Ashok Chavan In Aurangabad

एमआयएम मुस्लिमांच्या विकासासाठी नव्हे, युतीच्या मदतीसाठीच : चव्हाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात नव्याने दाखल झालेला एमआयएम हा पक्ष मुस्लिम समाजाच्या विकासासाठी नव्हे, तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीच्या मदतीसाठी आला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी पक्ष प्रचारानिमित्त आयोजित जाहीर सभांमध्ये केला. प्रक्षोभक भाषणे देऊन धार्मिक तेढ निर्माण करून मतांची विभागणी करणे हेच या दोन्हीही पक्षांचे काम आहे. युती आणि एमआयएम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचेही ते म्हणाले.

काँग्रेसच्या प्रचारासाठी चव्हाण यांच्या शहरात तीन सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभांना विश्वजित कदम, आरेफ नसीम खान, नितीन राऊत, जोगेंद्र कवाडे, सचिन सावंत, आमदार सुभाष झांबड, अरुण मुगदिया, महिला प्रदेश सरचिटणीस अॅड. जयश्री शेळके, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बकाल शहराचे धनी

युतीचे सत्ताधारी म्हणजे बकाल शहराचे धनी आहेत. त्यांनी फक्त टेंडर काढले, स्वत:चे खिसे भरले; पण शहराचा विकास केला नाही, असा आरोप चव्हाण यांच्यासह अन्य वक्त्यांनी बोलताना केला. केवळ पैसे मिळावेत यासाठीच खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या घरातील तिघांना उमेदवारी दिल्याचा आरोप नसीम खान यांनी केला.

शिवसेनेच्या एका नेत्याने मुस्लिम समाजाच्या मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, असा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगत उद्या हे मनुवादी दलित आणि ओबीसी समाजाचाही मतदानाचा अधिकार काढून घ्या म्हणतील, अशी टीका प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. अमूक एका समाजाची नसबंदी करा, कोणाचा अधिकार काढून घ्या, म्हणणारे देशभक्त कसे, असा सवालही त्यांनी केला.
राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आणखी एका निवडणुकीला सज्ज राहा, असा सल्ला दिला. राज्यातील सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होतील.
कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे ते म्हणाले.चव्हाण यांनी शुक्रवारी लक्ष्मण चावडी, मुकुंदवाडी आणि आमखास मैदान येथे सभा घेतल्या. मनपात काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन करतानाच आणखी एका निवडणुकीला कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असेही सांगून या निवडणुका केव्हा होतील हे सांगता येत नसले तरी लवकरच पुन्हा एक निवडणूक होईल आणि आपण पुन्हा सत्तेवर येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कारण "अच्छे दिन आयेंगे'चा दावा करणाऱ्यांनी जनतेला "बुरे दिन' दाखवणे सुरू केले असून त्यांच्या आश्वासनांचा भंडाफोड झाला आहे. त्यातच त्यांचे आपसात पटत नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी मध्यावधी होतील, असा तर्क त्यांनी लावला.

ते म्हणाले, गेल्या २८ वर्षांत युतीचे शासन औरंगाबादकरांना साधे पाणीही देऊ शकले नाही, तेव्हा त्यांनाच आता पाणी पाजण्याची वेळ आली आहे. त्यांनी औरंगाबादकरांच्या प्राथमिक गरजाही पूर्ण केल्या नाहीत. पालिकेच्या कामाचाच त्यांना विसर पडला असून एकदा काँग्रेसच्या हाती सत्ता दिल्यास नांदेडसारखा विकास करून दाखवीन, असा दावा त्यांनी केला. नांदेडला २४ तास पाणी मिळते, येथे का मिळत नाही, असा सवाल करतानाच याला फक्त युतीच्या नेत्यांचा भ्रष्टाचारच कारणीभूत असल्याचे ते म्हणाले.