आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समावेशाला महिना पूर्ण, पण समस्यांचा डोंगर कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सातारा-देवळाई परिसराचा मनपात समावेश होऊन १८ जून रोजी एक महिना पूर्ण झाला. परंतु याचा काहीही फायदा झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कचऱ्याचे ढीग येथे कायम असून नालेसफाईही केली जात नाही. अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या परिसरातील नागरी समस्या कधी संपणार, असा संतप्त सवालही विचारला जात आहे.
ग्रामपंचायत, नगर परिषदेच्या काळात पाणी, रस्ते, नाले अशा प्राथमिक समस्यांवर फारसे काम झाले नाही. पालिकेतील समावेशानंतर महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी भेट देऊन अनेक योजना, आदेशांचा पाऊस पाडला. मात्र प्राथमिक समस्यांचा निपटाराही पालिका प्रशासनाला करता आला नसल्याचे परिसरात फेरफटका मारल्यावर दिसते.

रस्ते बांधले मात्र तत्काळ खड्डे

परिसरात पालिकेने सात मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले, परंतु ज्या रस्त्यांचे काम झाले त्या रस्त्यांची अवस्था पहिल्यापेक्षाही बिकट झाली आहे. पाऊस पडताच सर्व रस्ते खड्डेमय होत डांबर निघण्यास सुरुवात झाली आहे.

नालेसफाईकडे दुर्लक्ष
परिसरात ड्रेनेजलाइन, सांडपाणी वाहून जाण्यासाठी नियोजित व्यवस्था नाही. मात्र नैसर्गिक नाल्यांद्वारेच संपूर्ण परिसरातील पाणी मुख्य प्रवाहात मिसळते. मात्र, नैसर्गिक नालेसफाई कामाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही.
आढावा बैठक घेऊ
- दोन दिवसांमध्ये आढावा बैठक बोलावून प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांची चौकशी केली जाईल.
त्र्यंबक तुपे, महापौर
सापत्न वागणूक
पालिकेत समावेशाने परिसराला स्वतंत्र वॉर्ड कार्यालय मिळाले. सी. एम. अभंग यांना या परिसराचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला, परंतु कार्यालयात तक्रार करण्यासाठी पालिकेचे अधिकारीच उपस्थित नसल्याची तक्रार केली जात आहे.
कशी आहे स्थिती
साताऱ्यात सहा नाले आहेत. त्यात झाडे, गवत वाढले आहे. पाऊस सुरू होताच नाले तुंबण्यास सुरुवात होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. परिसरात कचरा व्यवस्थापनासाठी कुठलीही स्वतंत्र व्यवस्था नसल्याने दोन ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्य परिसरातून कचरा उचलला जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र, सातारा-देवळाई परिसरातील अनेक मुख्य चौक, बीड बायपास रोड, वसाहतीमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत.
सातारा भागातील आलोकनगरात रस्त्यावर असा चिखल झाला असून नागरिकांचे हाल होत आहेत.
बातम्या आणखी आहेत...